www.24taas.com, मुंबई
आपल्या सौंदर्याचा वापर करीत ग्राहकांना भुलवायचे आणि त्यांना बदनाम करण्याची धमकी देत त्यांच्याकडून मौल्यवान ऐवज उकळायचा. अशा एका बारगर्लला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात अटक केली आहे.
रशिदा हर्षद गोईन असे या बारबालेचे नाव असून तिच्याविरुद्ध अनेकजणांच्या तक्रारी असल्याचे उघड झाले आहे. ३० ऑगस्ट रोजी एका बारबालेने आपले चार लाखांचे दागिने चारेल्याची तक्रार पोलिसात नोंदविल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
नॅशनल पार्क बोरिवलीतील एका रस्त्यावर रडत उभ्या असलेल्या रशिदाला पाहून विठ्ठल यांनी तिला रिक्षात लिफ्ट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत विक्रीसाठी आणलेल्या दागिन्यांच्या दोन बॅगा होत्या. त्यापैकी एक बॅग तिने नजर चुकवून लपवली. विठ्ठल घरी गेल्यानंतर त्यांचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांना समजले.
त्यानंतर त्यांनी तिला स्वत:हून तीन ते चार दिवस शोधून पाहिले. नतंर त्यांनी अखेर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आपले खबरी कामाला लावून रविवारी रशिदाला अटक केली. सुरुवातीला पोलिसांना न बधणार्या रशिदाने अखेर आपण बारमध्ये काम करीत असून दारू प्यायलेल्या कस्टमरना फशी पाडत असल्याचे कबूल केले. पाटील यांनासुद्धा आपण अशाच प्रकारे लुटल्याची कबुली तिने दिली.
रशिदाने अनेकजणांना लॉजमध्ये नेऊन नंतर ब्लॅकमेलिंग करून लुबाडले आहे. परंतु बदनामीच्या भीतीने कोणीच तक्रारीस पुढे आले नसल्याचे उघड झाले आहे. रशिदा हिने फसवणूक केलेल्यांनी पुढे यावे म्हणजे तिच्याविरुद्ध भक्कम केस उभी राहील असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप रावराणे यांनी केले आहे.