मुंबई : शिवसेना खासदार अनिल देसाई यांची भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे दोन्ही पक्षात अधिकच ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर सर्व निवडणूकांमध्ये शिवसेना भाजपमध्ये अनेक विषयांवर कलगीतुरा रंगला आहे. भाजपने आपल्या जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छाया चित्राचा वापर करून निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे, अशी तक्रार शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केली आहे.
निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्षांनी राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे वापरू नयेत, असा नियम असताना भाजपने शिवाजी महाराजांच्या चित्राचा वापर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने भाजपवर कारवाई करावी, अशी मागणीही अनिल देसाई यांनी पत्राद्वारे राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकावरून याआधीच दोन्ही पक्षांमध्ये मोठे राजकारण पाहायला मिळाले होते आणि आता निवडणूक प्रचारात राष्ट्रपुरूषांचे छायाचित्र वापरायचे की नाही यावरून आरोप प्रत्यारोप होतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.