भाजप-शिवसेनेत पुन्हा नवी ठिणगी, भाजपला सेनेचा 'आदेश' मान्य नाही!

शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. चक्क शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांना विश्वस्तपदावरून हटविण्याची मागणी भाजपने केलेय. 

Updated: Dec 18, 2015, 10:12 AM IST
भाजप-शिवसेनेत पुन्हा नवी ठिणगी, भाजपला सेनेचा 'आदेश' मान्य नाही! title=

मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. चक्क शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांना विश्वस्तपदावरून हटविण्याची मागणी भाजपने केलेय. 

मुंबई महापालिकेच्या अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स आणि मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहाच्या ललितकला प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदावरून अभिनेते आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर आणि अशोक हांडे यांना हटविण्याचा हट्ट भाजपने धरलाय.

या दोघांऐवजी स्थानिक नगरसेवकांना प्राधान्य देऊन त्यांना विश्वस्त म्हणून नेमण्याचा प्रस्ताव भाजप गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. आदेश बांदेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जात आहेत. त्यामुळे उद्धव यांना शह देण्यासाठी भाजपने ही चाल खेळली आहे. भाजपच्या या नव्या भूमिकेमुळे राजकीय रंग चढला आहे. 

अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स आणि कालिदास नाट्यगृहाचे उपक्रम म्हणजेच स्विमिंग पूल, नाट्यगृह व जिमचे व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी पालिकेने बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान या संस्थेला दिली आहे. ही संस्था पालिकेच्याच मालकीची असून महापौर, आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासह कलाकार, खेळाडू संस्थेच्या विश्वस्त मंडळावर आहेत. दरम्यान, कलाकार म्हणून आदेश बांदेकर, अशोक हांडे तर खेळाडू म्हणून विकी गोरक्ष, प्रदीप दंडे यांची विश्वस्तपदी नेमणूक करण्यात आलेय. 

दोन्ही ठिकाणी देखरेख आणि विकासकामे पालिकेतर्फे करण्यात येतात. मात्र या सर्व उपक्रमांमध्ये नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे विश्वस्त म्हणून स्थानिक नगरसेवकाची नियुक्ती करावी. त्याचा फायदा पालिकेला होईल, असा प्रस्ताव सुधार समितीचे अध्यक्ष आणि मुलुंडचे भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी गटनेत्यांच्या बैठकीपुढे मांडलाय. त्यामुळे पुन्हा भाजप-शिवसेना वाद रंगण्याची शक्यता आहे.