भाजपच्या घाटकोपर पूर्व बालेकिल्ल्यात अटीतटीची लढाई

भाजपचा बालेकिल्ला असणा-या घाटकोपर पूर्वमध्ये यावेळी अटीतटीची लढाई होतंय. सलग पाचवेळा निवडून आलेले भाजप आमदार प्रकाश मेहतांसमोर काँग्रेसच्या प्रविण छेडांनी चांगलेच आव्हान उभं केलंय. 

Updated: Sep 17, 2014, 08:25 PM IST
 भाजपच्या घाटकोपर पूर्व बालेकिल्ल्यात अटीतटीची लढाई  title=

मुंबई : भाजपचा बालेकिल्ला असणा-या घाटकोपर पूर्वमध्ये यावेळी अटीतटीची लढाई होतंय. सलग पाचवेळा निवडून आलेले भाजप आमदार प्रकाश मेहतांसमोर काँग्रेसच्या प्रविण छेडांनी चांगलेच आव्हान उभं केलंय. 

दोन गुजरातींमध्ये होत असलेली ही लढत मुंबईतल्या चुरशींच्या लढतीपैकी एक आहे. घाटकोपर पूर्व हा विधानसभा मतदारसंघ गुजरातीबहूल म्हणून ओळखला जातो. २ लाख ४५ हजार मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात ३२ टक्के गुजराती मतदार आहेत. तर ३४ टक्के मराठी, १३ टक्के उत्तर भारतीय, ५ टक्के मुस्लिम आणि ४ टक्के दक्षिण भारतीय मतदार आहेत.

तर इथल्या प्रमुख समस्यांमध्ये रमाबाई-कामराजनगर झोपडपट्टी पुनर्विकास, पंतनगर वसाहत पुनर्विकास तसंच जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीचा प्रश्न, वाहतूक समस्येचा समावेश होतो. 

लोकसभा निवडणुकीत भाजपला इथून तब्बल ७२ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. हा मतदारसंघ १९९० पासून भाजपच्या प्रकाश मेहतांनी आपल्या ताब्यात ठेवला असून ते या मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून आलेत. मागील २५ वर्षात केलेली कामे घेवून मतदारांसमोर जात असून यावेळेही जनता निवडून देईल असा विश्वास मेहतांनी व्यक्त केलाय.

भाजपातून काँग्रेसमध्ये येवून नगरसेवक झालेल्या प्रविण छेडा यांनी प्रकाश मेहतांसमोर कडवं आव्हान उभं केलंय. संपूर्ण  मतदारसंघात काँग्रेसला अनुकूल वातावरण निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले असले तरी ही लढत सोपी नसल्याची जाणीव त्यांनाही आहे. २५ वर्षात मतदारसंघात ठोस कामे झाली नसून एक नवा चेहरा म्हणून घाटकोपरकर आपल्या पाठिशी राहतील. असा विश्वास छेडांनी व्यक्त केलाय.मनसे,बसपसहित इतरही उमेदवार मैदानात असले तरी खरी लढत ही मेहता-छेडा दोन गुजरातींमध्येच होत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.