खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपसमोरील आव्हानं वाढणार

एकनाथ खडसेंचा राजीनामा झाल्यानंतर आता भाजपासमोरील आव्हाने वाढणार आहेत.

Updated: Jun 4, 2016, 11:12 PM IST
खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपसमोरील आव्हानं वाढणार title=

दीपक भातुसे, मुंबई : एकनाथ खडसेंचा राजीनामा झाल्यानंतर आता भाजपासमोरील आव्हाने वाढणार आहेत. तर दुसरीकडे या राजीनाम्याने एकनाथ खडसेंच्या राजकीय कारकिर्दीलाही ग्रहण लागले आहे. राजकारणात अनेक चढउतार पाहिलेल्या एकनाथ खडसेंना राजकारणातील सगळ्यात मोठा फटका बसला आहे. 

गैरव्यवहारांच्या आरोपावरून खडसेंना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. खडसेंच्या या राजीनामाचे परिणाम स्वतः खडसे यांना आणि भाजपालाही भविष्यात भोगावे लागणार आहेत. खडसे यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला आता बॅकफूटवर यावे लागणार आहे. भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर आतापर्यंत विधीमंडळाची पाच अधिवेशने झाली. या अधिवेशनात एकनाथ खडसे सरकारची बाजू जोरदार लावून धरायचे. आता ही कमतरता पक्षाला जाणवणार आहे. 

दुसरीकडे मुख्यमंत्री असतील किंवा भाजपचे दुसरे मंत्री असतील, विधीमंडळ अधिवेशनात विरोधकांच्या आरोपांना उत्तर देतांना तुमची 15 वर्षांची प्रकरणे बाहेर काढू का अशी धमकी द्यायचे. मात्र आता खडसेंचा राजीनामा झाल्यानंतर भाजपाला विधीमंडळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावर विरोधकांना टार्गेट करताना काहीसे नमते घ्यावे लागणार आहे. तर खडसेंच्या राजीनाम्यामुळे छाती फुगलेले विरोधक सरकारवर अधिक जोमाने तुटून पडण्याची चिन्हं आहेत. त्यातच नारायण राणेंसारखा आक्रमक नेता आता विधिमंडळात असणार आहे. त्यामुळे भाजपाची कोंडी होण्याची चिन्हं आहेत. 

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचारविरोधी प्रचार करून भाजपा सत्तेवर आला. मात्र त्याच पक्षातील एका मंत्र्यावर आरोप होणे हे पक्षासाठी दुर्दैवी आहे. ना खाऊंगा ना खाने दुंगा अशी घोषणा सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. मात्र भाजपाच्याच सरकारमधील एका मंत्र्याला अशा पद्धतीने राजीनामा द्यावा लागल्याने भाजपाची देशपातळीवर नाचक्की झाली आहे. विरोधक ही संधी साधून भाजपाला देशपातळीवर बदनाम करण्याची मोहीम उघडण्याची चिन्हं आहेत. खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या महसूल आणि कृषी खात्यासह महत्त्वपूर्ण खाती कुणाकडे द्यायची हा प्रश्न पक्षासमोर आहे. 

येत्या जूनच्या मध्यावर राज्यात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विस्तारात काही नवे चेहरे मंत्रीमंडळात येतील. त्यांच्याकडे काही खाती दिली जातील. मात्र महसूल खातं कुणाकडे द्यायचं हा मोठा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर असणार आहे. सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटील यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे हे खाते सोपवण्याचा विचार केला जाऊ शकतो. किंवा स्वतः मुख्यमंत्री आपल्याकडे हे खाते ठेवू शकतात. 

महाराष्ट्र भाजपामध्ये सगळ्यात ज्येष्ठ असलेल्या एकनाथ खडसेच्या राजकीय वाटचालीलाही यामुळे ग्रहण लागण्याची चिन्हं आहेत. आक्रमक असलेल्या खडसेंना आता आपल्या आक्रमकतेला मुरड घालावी लागणार आहे. तर यामुळे खडसेंचे पक्षांतर्गत विरोधक अधिक आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. एकूणच खडसेंच्या राजीनाम्यानंतर स्वतः खडसे यांची आणि भाजपाची पुढील वाटचाल निश्चितच कठीण असणार आहे आणि यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी लागणार आहे.