भाजपकडून उद्धव ठाकरेंसाठी ५५ किलोच्या वाघाची भेट

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर भाजपनं शिवसेनेला डावललं असलं तरी आता मात्र सेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय. 

Updated: Jan 5, 2016, 01:27 PM IST
भाजपकडून उद्धव ठाकरेंसाठी ५५ किलोच्या वाघाची भेट    title=

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर भाजपनं शिवसेनेला डावललं असलं तरी आता मात्र सेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय. 

याचाच एक भाग म्हणून भाजप लवकरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचं प्रतिक असणाऱ्या 'वाघा'चं एक प्रतिरुप भेट म्हणून देणार असल्याचं समजतंय. ही वाघाची प्रतिकृती ७ फूट लांब, ३.५ फूट रुंद आणि जवळपास ५५ किलोची असल्याचं समजतंय. 

या अनोख्या गिफ्टमुळे भाजप आणि शिवसेनेतील ताणले गेलेले संबंध सुधारण्यासाठी मदत होईल अशी आशाही भाजपला वाटतेय. कारण, उद्धव ठाकरे हे एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत आणि वाघांचं त्यांना विशेष आकर्षणही आहे. 

भाजपकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंना एक वाघाची प्रतिकृती भेट देणार आहेत. याचा काही राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असंही ते म्हणतातय. 

हा वाघ म्हणजे आमच्या मैत्रीचं प्रतिक आहे आणि यातून आम्ही 'सेव्ह द टायगर्स' या मोहिमेचाही प्रसार करणार आहोत, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.