रहिवाशांचं समर्थन: पण कॅम्पा कोलामध्ये लतादीदींचे 2 फ्लॅट!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करून कॅम्पा कोला रहिवाशांची बाजू उचलून धरल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आतापर्यंत एखाद्या सामाजिक विषयावर क्वचित प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या लतादीदींना कॅम्पा कोलावासियांबद्दल एवढी सहानुभूती का, असा प्रश्न पडला होता. मात्र लतादीदींच्या या ट्विटमागचं खरं वास्तव आता समोर आलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 10, 2014, 03:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करून कॅम्पा कोला रहिवाशांची बाजू उचलून धरल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आतापर्यंत एखाद्या सामाजिक विषयावर क्वचित प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या लतादीदींना कॅम्पा कोलावासियांबद्दल एवढी सहानुभूती का, असा प्रश्न पडला होता. मात्र लतादीदींच्या या ट्विटमागचं खरं वास्तव आता समोर आलंय.
कॅम्पा कोला कंपाऊंडमधील ईशा एकता अपार्टमेंटमध्ये लतादीदींच्या नावे दोन फ्लॅट असल्याची माहिती उजेडात आलीय. 801 आणि 802 असे दोन फ्लॅट लतादीदींच्या नावावर आहेत. या फ्लॅटमध्ये हृदयनाथ मंगेशकर यांचे चिरंजीव आदिनाथ मंगेशकर राहतात. त्यामुळंच लतादीदींना कॅम्पा कोलावासियांचा पुळका आलाय की काय, अशी चर्चा आता रंगलीय.
अनाधिकृत मजले बांधकामप्रकरणी मुंबईतील कॅम्पा कोला इमारत सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. कॅम्पा कोलातील रहिवाशांची शेवटची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर महापालिकेनं घरं रिकामी करण्यासाठी रहिवाशांना शेवटची संधी दिली आहे. त्यामुळं रहिवाशांना येत्या 12 तारखेला कोणत्याही परिस्थितीत घरं रिकामी करावी लागणार आहेत.
लता दीदींनी रहिवाशांचं समर्थन केलं तरीही राज्य सरकारकडून त्यांना कोणताही दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यानी दिलं आहे. कॅम्पा कोलाप्रकरण म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया असल्यानं त्यात राज्य सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.