कॅम्पाकोलावासियांना पालिकेची नोटीस, फक्त दोन दिवस

कॅम्पाकोलावासियांना घरं रिकामी करण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरलेत. 12 जूनपर्यंत घरं रिकामी करण्याची नोटीस मुंबई महापालिकेनं कॅम्पाकोलावासिय़ांना बजावली आहे.

Updated: Jun 11, 2014, 08:00 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कॅम्पाकोलावासियांना घरं रिकामी करण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरलेत. 12 जूनपर्यंत घरं रिकामी करण्याची नोटीस मुंबई महापालिकेनं कॅम्पाकोलावासिय़ांना बजावली आहे.
इच्छा नसूनही इथल्या अनेकांना घरं सोडावं लागतंय. यापैकी एक म्हणजे डॉ. आशा पोतदार. त्यांची करुण कहाणी ऐकून कुणाचंही हृदय हेलावल्याशिवाय राहणार नाही. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेल्या या आहेत 92 वर्षीय डॉ. आशा पोतदार. आजारपणामुळं सध्या त्या अंथरुणाला खिळल्यात. कॅम्पाकोला सोसायटीत राहणा-या डॉ. आशा यांना मुंबई महापालिकेनं वर्षभरापूर्वी नोटीस बजावली. त्यानंतर त्यांनी जो धसका घेतला, तेव्हापासून त्या अंथरुणावरुन उठूच शकल्या नाहीत.
मात्र आता त्यांना अंथरुणच नाही तर घरंही सोडून जावं लागणार आहे. इथल्या रहिवाशांना 12 जूनपर्यंत चाव्या देण्याची नोटीस बजावल्यानंतर डॉ. आशा यांची मुलगी आणि त्यांचे जावई डॉ. प्रमोद पोतदार यांनी सामानाची बांधाबांध सुरु केलीय. मुंबईत दुसरं घर नसल्यानं भाड्यानं घेतलेल्या गोदामात घरातील साहित्य हलवलं जातंय. आयुष्याची कमाई एकत्र करून विकत घेतलेला फ्लॅट सोडून जाण्याची वेळ त्यांच्यावर आलीय.
कँम्पाकोलामध्ये मोजकी मराठी कुटुंबं आहेत. त्यापैकी एक पोतदार कुटुंबीय आहे. आता घर सोडून रस्त्यावर येण्याची वेळ आल्यानं कुटुंबातल्या सा-यांनाच अश्रू अनावर झालेत. अशा कठीण समयी अंथरुणाला खिळलेल्या 92 वर्षीय आजारी वृद्ध डॉ. आशा यांना कुठं घेऊन फिरायचं असा प्रश्न पोतदार कुटुंबीयांना पडलाय. पोतदार कुटुंबीयांप्रमाणे इथं राहणा-या कुणाचीही घर सो़डून जाण्याची इच्छा नाही. त्यामुळं पुढं काय असा प्रश्न पडला असला तरी हिंमत मात्र ते हरलेले नाहीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.