www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘पेड न्यूज’ प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आरोप निश्चित झालेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या दोन खासदारांपैकी एक अशोक चव्हाण आहेत. लोकसभा निवडणुकीत यश मिळालं असलं तरी ‘पेड न्यूज’ प्रकरणात मात्र ते पुरते फसले आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर निवडणूक आयोगानं पाच आरोप निश्चित केलेत. हे आरोप सिद्ध झाले तर चव्हाण यांची खासदारकी रद्द होण्याची चिन्हं आहे. साहजिकच, यामुळे काँग्रेसच्या गोटातही भीतीचं वातावरण आहे.
येत्या 9 जूनपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होऊन 20 जूनपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपद सोडावं लागलेल्या अशोक चव्हाणांना या प्रकरणामुळे खासदारकी सोडावी लागणार का? याच प्रश्नावर राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
काय आहे पेड न्यूज प्रकरण
२००९च्या विधानसभा निवडणुकीनंतर अशोक चव्हाण यांनी आयोगाकडे सादर केलेल्या निवडणूक खर्चात विविध वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातींचा खर्च फक्त ११ हजार रूपये दाखवला होता. त्यावर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी राज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी आक्षेप घेतला होता आणि चव्हाण यांनी जाहिरातींवर केलेल्या खर्चाची चौकशी व्हावी, यासाठी याचिका दाखल केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.