मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणात गरजेपेक्षा जास्त रस घेतल्यानेच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना हटवण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
संभाव्य वाद टाळण्यासाठी मुदतीच्या आधीच हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी एएनआयला सांगितले. राकेश मारियांबाबत जेव्हा हा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्याबाबत दोन-तीन वाद निर्माण झाले होते. ललित मोदी प्रकरणी मारियांनी दिलेले स्पष्टीकरण सरकारने मान्य केले.
शीना बोरा हत्या प्रकरणात मारियांनी जास्त रस दाखवला. त्यांच्या या कृतीमुळे अनेक सवाल उपस्थित झाले होते असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राकेश मारिया यांची बदलीबाबत बोलताना ते म्हणाले, मारिया यांना महासंचालकपदी बढती देण्यात आली. ठराविक कालावधीच्या आधी एखाद्या आयुक्ताची बदली होण्यात काहीच गैर नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.