कुर्लामधील सिटी किनारा हॉटेल मालकाला अटक, चार कर्मचारी निलंबित

कुर्ल्याच्या सिटी किनारा हॉटेलला ऑक्टोबरमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी हॉटेल मालक याला अटक करण्यात आली. तर  पालिकेच्या चार कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

Updated: Dec 2, 2015, 10:42 AM IST
कुर्लामधील सिटी किनारा हॉटेल मालकाला अटक, चार कर्मचारी निलंबित title=

मुंबई : कुर्ल्याच्या सिटी किनारा हॉटेलला ऑक्टोबरमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी हॉटेल मालक याला अटक करण्यात आली. तर  पालिकेच्या चार कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

पालिकेने केलेल्या कारवाईत दोन स्वच्छता निरीक्षक, एक दुय्यम अभियंता आणि एक मुकादम यांना निलंबित करण्यात आले आहे. यात दीपक भुर्के, राजेंद्र चौहान , राजेंद्र राठोड, तुळशीराम वाघवळे यांचा समावेश आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ही कारवाई केली आहे. 

८ बळी गेलेल्या या आगीच्या दुर्घटनेला दीड महिना झाला तरी त्याचा अहवाल आला नाही व कोणावरही कारवाई केली नाही या मुद्द्यावरून शिवसेनेच्या नगरसेवकांनी गेल्याच आठवड्यात आरोग्य समितीमध्ये जाब विचारला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने ही कारवाई केली.

या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने २४ वॉर्डांतील हॉटेलांची तपासणी करून कारवाई केली. तसेच या घटनेबाबत उपायुक्त भरत मराठे यांची विशेष चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालानंर ही कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान, सिटी किनारा हॉटेलला पालिकेने यापूर्वी दोनदा नोटीस बजावली होती. २०१३ मध्ये एकदा व सप्टेंबर महिन्यात दुसर्‍यांदा नोटीस बजावण्यात आली होती. या हॉटेलचा पोटमाळा अनधिकृत असल्याची नोटीस देण्यात आली होती. या पोटमाळ्यावरच जेवायला बसलेल्या दुर्दैवी ग्राहकांना जीव गमवावा लागला. मात्र या नोटिसीवर अधिकार्‍यांनी पुढे काहीही कारवाई न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.