दिंडोशी फ्लायओव्हर किमान महिनाभर बंद

पश्चिम उपनगरातील वाहतुकीची वर्दळ असलेला दिंडोशी फ्लायओव्हर पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. शनिवारपासून दुरुस्तीचे काम सुरू झाले असून, किमान महिनाभर फ्लायओव्हर बंद असेल.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 5, 2014, 10:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पश्चिम उपनगरातील वाहतुकीची वर्दळ असलेला दिंडोशी फ्लायओव्हर पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. शनिवारपासून दुरुस्तीचे काम सुरू झाले असून, किमान महिनाभर फ्लायओव्हर बंद असेल.
दक्षिण मुंबईतल्या भायखळा ब्रिजनंतर आता पश्‍चिम उपनगरातील दिंडोशी फ्लायओव्हरही एक ते दीड महिना वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली दिंडोशी फ्लायओव्हर येत असून, फ्लायओव्हरवरील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलंय. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होतीय.
दिंडोशी प्लायओव्हर दुरुस्तीसाठी बंद केल्यानं ही सारी वाहतूकीची कोंडी झालीय. मुंबईतल्या उपनगरातून सकाळच्या वेळी वाहनांची संख्या मोठी असते. कोणतीही पूर्वकल्पना न देता फ्लायओव्हर बंद करण्यात आलाय.त्यामुळे गोंधळात मोठी भर पडलीय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दिंडोशी फ्लायओव्हरच्या दुरुस्तीसाठी ५६ लाख मंजूर करण्यात आले आहेत. या फ्लायओव्हरच्या दुरुस्तीच्या कामाचे कंत्राट मुंबई एन्ट्री पॉइंट्स लिमिटेडला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या फ्लायओव्हरच्या दुरुस्तीबाबत आयआयटी मुंबईने यापूर्वीच अहवाल सादर केला होता. मात्र या दुरुस्तीच्या कामात उशीर झाल्यानं वाहनचालकांच्या त्रासात भर पडलीय.
यावर उपाय म्हणून मालाडच्या पठाणवाडी ते गोरेगाव ओबेरॉय मॉलपर्यंत सकाळी ७ ते रात्री १0 वाजेपर्यंत सर्व्हिस रोडवर पार्किंग करण्यास मनाई करण्यात आलीय. त्यामुळे पुढचे काही दिवस मुंबईकरांसाठी त्रासदायक असतील हे नक्की आहे. कारण रस्ता बंदमुळे बी.ए. रोडवर डी.के. रोड जंक्शनपासून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक बंद, लालबाग ब्रिजहून दक्षिण वाहिनीने अवजड वाहनांना बंदी, गॅस कंपनी जंक्शन येथे दक्षिण वाहिनीवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद, बी.ए. रोडवर गांधी मार्केट येथे दक्षिण वाहिनीने जाणारी वाहतूक बंद, खोदादाद सर्कल येथे बी.ए. रोडवर दक्षिण वाहिनीवरील वाहतूक बंद असणार आहे.
दरम्यान, वाहतुकीसाठी पर्याय मार्ग सुचविण्यात आले आहेत. डी.के. रोड जंक्शन - डावे वळण - टोमानी जंक्शन मार्गे - बॅरिस्टर नाथ पै मार्गे - रे रोड. गॅस कंपनी जंक्शन - उजवे वळण, साने गुरुजी मार्ग, एन.एम. जोशी मार्ग - बकरी अड्डा - भायखळा रेल्वे स्थानक (प.) - घोडके चौक - डावे वळण - बी.जे. रोड - खडा पारशी जंक्शन - बी.ए. रोड. बी.ए. रोड - गांधी मार्केट येथून डावे वळण घेऊन चार रस्ता मार्गे. बी.ए. रोडवर खोदादाद सर्कल येथे डावे वळण घेऊन वडाळा बेस्ट डेपो मार्गे - चार रस्त्याकडे वाहतूक वळविण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.