मुंबई : दिवाळी वायू आणि ध्वनी प्रदूषणरहीत साजरी व्हावी यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न असतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई शहरातील आवाजाची आकडेवारी जाहीर केली आहे. गोरेगाव आणि मुलुंडमध्ये सर्वाधिक आवाजाची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई शहर आणि उपनगरात दिवाळीच्या तीन दिवसातील आवाजाची नोंद केली. यात 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2016 या दिवसांची नोंद आहे. गोरेगावमध्ये सर्वाधिक 81.4 डेसिबलपर्यंत ध्वनी प्रदूषण झाल्याची नोंद झाली असून मुलुंडमध्येही 77. 5 डेसीबल आवाजाची नोंद झालीय.
शिवाजी पार्क आणि माहिममध्ये 76.9 डीबीची नोंद झालीये. विशेष म्हणजे रात्रीच्या तुलनेत दिवसा ध्वनी प्रदूषण जास्त असल्याचे वास्तव समोर आले आहे. नागरी वस्त्यांमध्ये दिवसा 55 डीबी तर रात्री 45 डेसीबलची नोंद झाली आहे. तर शांतता क्षेत्रात दिवसा 50 तर रात्री 40 डेसीबल आवाजाची नोंद झाली. तर कर्मशिअल झोनमध्ये सर्वाधिक आवाजाची पातळी होती. दिवसा 65 तर रात्री 55 डेसीबल आवाज नोंदवला गेला आहे.
मंत्रालयाजवळ 71, वरळी पासपोर्ट ऑफिस 77.1, माहीम पोलीस कॉलनी जवळ 76.9 डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार करता 2014 मध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदूषण झाले. त्यानंतर 2015 मध्ये आवाजाची पातळी जरा कमी होती. मात्र, यावर्षी 2016 मध्ये या मागिल दोन वर्षांपेक्षा खूपच कमी ध्वनी प्रदूषण झालेय. 2014 मध्ये 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान दहीसर 91.1, कुलाबा 99.8, प्रभादेवी 93, वडाळा 98.7, भांडूपमध्ये 91.7 आणि हिरानंदानी पवई येथे 93.2 डेसिबल आवाजाची नोंद झाली.
2015 मध्ये ट्रॉम्बे 90, वर्सोवा 87.6, बोरीवली 86, चेंबूर 78,5, कामाठीपुरा 83.5, मार्वे चर्च जवळ 76 डेसिबल आवाजाची नोंद झाली. 11 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यानची ही नोंद आहे.