www.24taas.com,मुंबई
मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी लवकरात लवकर जमीन देण्यात येईल, असं आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिलंय. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आज मुंबई दौ-यावर आहेत.
मुंबई हायकोर्टानं दीडशे वर्ष पूर्ण केल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी इंदूमिल प्रश्नी सर्व पक्षीय शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
स्मारकप्रश्नी आपल्या भावना मला कळतात दिल्लीत गेल्यानंतर वस्त्रोद्योग मंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढून स्मारकासाठी आवश्यक असलेला जागेचा प्रश्न मार्गी लावू असं पंतप्रधानांनी म्हटंलय.
मुंबईत इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकाला देण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आले होते. मुंबईत आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागमी रामदास आठवले यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. जमिनीचा प्रश्न प्रलंबित होता. जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी आज पंतप्रधानांना साकडे घालण्यात आले.
आपण निश्चिंत राहावे, असे शिष्टमंडळाला पंतप्रधानांनी सांगितले दिल्लीस पोचल्यानंतर वस्त्रोद्योग आणि पर्यावरण मंत्रालयांशी चर्चा करून आपण हे अडथळे दूर करू, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे.
या शिष्टमंडळात मुख्यमंत्री चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मंत्री नसीम खान, वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे खासदार एकनाथ गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, सचिन अहीर आणि लक्ष्मण ढोबळे यांच्यासह आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई आणि गंगाधर गाडे यांचाही समावेश होता.