मुंबई : महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट घोंगावत असल्याचं दिसतंय. येत्या आठवड्याभराच्या आत महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर आणखी भीषण परिस्थिती ओढवणार आहे.
जुन-जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस होईल अशी शक्यता असताना, जून महिना कोरडा गेला, जुलै महिन्यात काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला एवढा पाऊस झाला.
मात्र महाराष्ट्रातील बराचसा भाग तेव्हा देखील तहानलेला होता, त्यातल्या त्यात आता बहुतांश भागात २० दिवसापासून पाऊस नसल्याने परिस्थिती भीषण झाली आहे.
डाळीवर्गीय पिकांना पाऊस न आल्याने मोठा फटका बसण्याची शक्यता वाढली आहे. दुष्काळी वर्ष असल्याने जमिनीत पाणीचं नव्हते त्यातल्या त्यात दोन-चार पाऊसच झाल्याने अजूनही जमिनीला पाण्याचा पाझर फुटलेला नाही.
यामुळे या वर्षी पावसाचं प्रमाण अत्यल्पच असल्याचं दिसून येत आहे, ९० टक्के विहिरींना पावसानंतर येणारं पाणी अजून आलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.