कृष्णात पाटील, मुंबई : परिस्थिती कितीही कठिण असली तरी अग्निशमन दलाचे जवान चपळाईनं आपली कामगिरी बजावतात आणि लोकांचे प्राण वाचवतात. याचंच प्रात्यक्षिक मुंबईतल्या भायखळा अग्निशमन दल केंद्रात पाहायला मिळालं. याच ठिकाणी समर नावाच्या आगीशी लढणाऱ्या रोबोचंही प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.
रिमोट कंट्रोलच्या मदतीनं आग विझवणारा 'रोबोट' लवकरच मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. 'समर' असं या रोबोटचं नाव आहे. इंडो फ्रेच बनावटीचा हा समर तब्बल ७०० डिग्री तापमानातही पूर्ण क्षमतेनं काम करु शकतो. अति उच्च ज्वलनशील पदार्थ, किरणोत्सारी क्षेत्र, विषारी वायू, या ठिकाणी जिथे प्रचंड धोका आहे, तिथे हा समर रोबोट अगदी सहजपणे कामगिरी करु शकतो.
आधी ९१ फुटी शिडी, त्यानंतर तंत्रज्ञानात केलेले बदल आणि आता आगीशी लढणारा रोबोट... हे सगळं असलं तरी प्रत्यक्षात अग्निशमन दलाच्या जवान आणि अधिका-यांनाच आगीशी सर्वात आधी सामना करावा लागतो. यात त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असतं ते वाहतूक आणि दाटीवाटीच्या इमारतींतून मार्ग काढण्याचं...
अग्निशमन दलानं काळबादेवी अग्निकांडात धडाडीचे चार अधिकारी गमावले. त्यानंतर खूप चर्चाही झाल्या आणि त्याच्या अहवालांवरही धूळ चढली. पण फक्त आयुधांनीच युद्ध जिकंता येत नाहीत. त्यासाठी मुंबईला भेडसावणाऱ्या अनधिकृत, धोकादायक बांधकांमांच्या आव्हानाचा सामना करणंही गरजेचं आहे. नाही तर ताफ्यात कितीही अत्याधुनिक समर आले तरी, जवानांचं जिवावरचं युद्ध संपणार नाही.