राज्यात सर्वत्र बाप्पाच्या उत्साहाला उधाण

राज्यात सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची धूम आहे. मुंबईतर रात्रीपासून बाप्पाचा जयघोष सुरु आहे. मराठी भाषिकांचा प्रभाव असलेल्या लालबाग, चिंचपोकळी, परळ, दादर परिसरात तर उत्साहाला उधाण आलं होतं. उपनगरातही बाप्पाचं जोरदार स्वागत होतंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 10, 2013, 07:32 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
राज्यात सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची धूम आहे. मुंबईतर रात्रीपासून बाप्पाचा जयघोष सुरु आहे. मराठी भाषिकांचा प्रभाव असलेल्या लालबाग, चिंचपोकळी, परळ, दादर परिसरात तर उत्साहाला उधाण आलं होतं. उपनगरातही बाप्पाचं जोरदार स्वागत होतंय.
गणेशोत्सव हा तर पुण्याचा मानबिंदू. सकाळी मानाच्या पाच गणपतींची पारंपरीक पद्धतीनं आणि मंगलमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेली दिमाखदार मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीये. तर नाशिकमध्येही पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं आगमन झालं. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय.
लालबाग, परळ, चिंचपोकळी भागात मोठ्या उत्साहात वाजतगाजत बाप्पाचं आगमन झालंय. मोठ्या भक्तीमय वातावरणात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलीये. गणेशगल्लीमध्ये गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होतेय. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष आहे. बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरच्या सेलिब्रेटीही गणेशाच्या आराधनेत दंग झाल्यात.
तर राजकारणातून थोडा वेळ काढून सर्वच पक्षांचे नेतेही गणेशभक्तीमध्ये तल्लीन झालेत. या सगळ्यासोबत तुमचा-आमचाही लाडका बाप्पा घराघरात विराजमान झालाय. अनेक सोसायट्या-मंडळांचे मंडप गणेशभक्तीनं सजले आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला. यात हजारो स्त्रियांनी सहभाग घेतला. शंखनादाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर ओंकारनाद करण्यात आला आणि अथर्वशीर्ष पठण सुरू झालं.. या कार्यक्रमाला दहा वर्षांची परंपरा आहे. कोणत्याही जाहिरातीशिवाय महिला वर्ग अथर्वशीर्ष पठणासाठी येथे जमा होतो.
आतापर्यंत आपण लाकडावर, दगडावर , सुपारीवर कोरीव काम करून गणपतीची मूर्ती साकारताना कलाकारांना पाहिलंय. मात्र फळ्यावर लिहल्या जाणा-या खडूवर कोरलेला गणपती एका अवलिया मुर्तीकाराने साकरालाय. चला तर मग आज आम्ही तुम्हाला आज दाखवतोय खडूवर कोरलेला गणपती.
राजकारणातून वेळ काढत सर्वच नेत्यांनी आपल्या घरात गणरायाची प्राणप्रतिष्ठा केलीये. मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान, अर्थात वर्षा बंगल्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सपत्निक गणरायाची पूजा केली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानीही गणरायाचं आगमन झालंय.
तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या घरी यंदा त्यांचे पुत्र उन्मेश यांच्या हस्ते गणरायाची पूजा झाली. पंतांना पुन्हा लोकसभेत जाण्याची स्वप्न पडत असताना त्यांना यासाठी बाप्पाचा आशीर्वाद हवाय. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याही मुंबईतल्या घरी बाप्पा विराजमान झालेत. त्यांनी तर चक्क राज्य आणि केंद्रातले सगळे मंत्री बदलले जावेत, असंच साक़डं मुंडेंनी गणरायाला घातलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.