www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
मुंबईतील रेल्वेची उद्घोषणा अनेकवेळा चेष्टेचा विषय होतो. रेल्वे प्रशासनाकडून काय घोषणा करण्यात येत आहे तेच नक्की कळत नाही. मात्र, ही उद्घोषणा ऐकून प्रवाशी खूश झाले. लेडीज फर्स्ट क्लास डब्यात मुलगी जन्मली. याची उद्घोषणा रेल्वेने केली आणि वसई स्टेशनवर रेल्वेत मुलीचा जन्म झाल्याची चर्चा सुरू झाली.
सकाळची वेळ. ऑफिसला जाण्याची. मुंबई गाठायचे म्हणजे लोकल पकडण्याची घाई. विरार-दादर लोकल सकाळी ६.१८वाजता सुटली. वसई स्टेशनात रोजच्या प्रमाणेच लोकल आली. यावेळी एका महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्या आणि महिलांची पळापळ झाली. कोण मदतीला मिळेल का? कसं होणार, याची चर्चा. तर काहीजणी मोटरमनच्या दिशेने धावल्या. त्यांनी मोटरमनला गाडी थांबविण्याची विनंती केली. मोटरमनने गाडी थांबविली.
वसई स्टेशनमध्ये लोकल २० ते २५ मिनिटे थांबली. याच लोकलमध्ये काही नर्स प्रवास करीत होत्या. या नर्सच्या मदतीने त्या महिलेचे बाळंतपण सुखरूप पार पडले. महिलाला कन्यारत्न प्राप्त झाल्याची माहिती नर्सनी दिली. त्यानंतर रेल्वेने लोकलमध्ये मुलगी झाल्याची उद्घोषणा केली. त्यावेळी अन्य प्रवाशांना होत असलेल्या धावपळीची आणि गाडी का थांबविली याची माहिती मिळाली. यावेळी मात्र गाडी सुटायला उशीर झाल्याबद्दल एकाही प्रवाशाची तक्रार नव्हती. रेल्वेने लोकलमध्ये `मुलगी झाली`ची उद्घोषणा करताच वसईच्या प्लॅटफॉर्मवर जल्लोष पसरला. त्यानंतर रेल्वेने वेग घेतला आणि दादरच्या दिशेने गाडी निघाली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.