www.24taas.com, अमोल देठे, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र सरकारचा नवी मुंबई एअरपोर्टच्या बदल्यात समुद्रात एअरपोर्ट बनवण्याचा विचार सुरू आहे.
नवी मुंबई एअरपोर्टसाठी जागा मिळवण्याची डोकेदुखी बंद करण्यासाठी, सरकारने यावर जालीम उपाय काढायचं ठरवलंय.
थेट पाण्यावरच एअरपोर्ट बनवण्यासाठी सरकारने कंबर कसलीय.
(बातमीचा फोटो जपानमधील समुद्रावरील कंसाई एअरपोर्टचा आहे)
राज्य सरकारने यासाठी नेदरलँडची कंपनी रॉयल हेस्कोनिंग डीएचव्हीला या सर्वेचं कामही दिलं आहे. समुद्रात एअरपोर्ट बनवण्यासाठी कमी खर्च येणार आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे जमीन विकत घेण्याच्या कटकटीतून सरकार सुटणार आहे. भविष्यात समुद्राची जमीन भरूनही एअरपोर्टचा विस्तार करणं कठीण नसेल, हे ही या मागचं एक कारण आहे.
जपानच्या ओसाका शहराचं कनसाई इंटरनॅशनल एअरपोर्ट पूर्णपणे समुद्रावर तयार कऱण्यात आलं आहे. हे एअरपोर्ट बनवण्यासाठी समुद्रात दगडांचा भराव करण्यात आला आहे. यानंतर तयार झालेल्या जमीनीवर एअरपोर्ट बनवण्यात आलं आहे. या प्रमाणे महाराष्ट्र सरकार मुंबईत नवं इंटरनॅशनल एअरपोर्ट बनवण्याच्या तयारीत आहे.
नवी मुंबई एअरपोर्टसाठी जमीन मिळवण्यात येत असलेल्या अडचणी, आकाशाला पोहोचलेले भाव यावरून सरकारने नवीन उपाय शोधायला सुरूवात केली आहे.
नवी मुंबई एअरपोर्टसाठी सध्या नियोजित असलेल्या जागेच्या जवळ पनवेल क्रीकमधील मढ आयलँडकडे एक महत्वाचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.
यासाठी नेदरलँडची कंपनी रॉयल हेस्कोनिंग डीएचव्हीला सर्वेचं काम सोपवण्यात आलं आहे्.
जाणकारांच्या मते समुद्रावरील एअरपोर्टला खर्च कमी येईल आणि यापुढे जमीनीचा विस्तार करण्यासाठीही हे सर्व सोप असणार आहे.
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा विस्तार १९९८मध्ये पास करण्यात आला होता. तेव्हा अंदाजित रक्कम जवळ जवळ ४ हजार ८०० कोटी रूपये होती.
मात्र जमिनीच्या किमतीत होणारी भरमसाठ वाढ आणि भूसंपादनासाठी होणारी पैशांची मागणी आणि राजकारण यावरून, या एअरपोर्टची किंमत १४ हजार ५०० कोटी रूपयांपर्यंत येऊन पोहोचलीय.
नवी मुंबई एअरपोर्टच्या प्रोजेक्टवर अजून व्यवस्थित कामंही सुरू झालेलं नाही, यामुळे सरकारने पनवेल जवळील मढ आयलँडजवळ समुद्रात भर करून एअरपोर्ट बनवण्याचा विचार सुरू केला आहे.
जर जमीनीपासून अंदाजित दीड मीटर उंचीवर एअऱपोर्ट बनवलं तर ३ हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. जर आणखी सुरक्षित एअरपोर्ट बनवायचं असेल, तर जमीनीपासून आठ मीटर उंचीवर एअरपोर्ट बनवायचं असेल, तर अंदाजित ६ हजार कोटी रूपये खर्च येणार आहे.
यामुळे कोणत्याही गावाला स्थलांतरीत करण्याची गरज पडणार नसल्याने, एअरपोर्ट बनवण्यासाठी खर्च फारच कमी येणार आहे. मात्र हा प्रोजेक्ट मंजूर करण्यासाठी साडेचार वर्षांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे.
जगातील अनेक देशात समुद्रावर एअरपोर्ट बनवण्यात आले आहेत. कंसाई एअरपोर्टसह हॉन्गकॉन्गचं एअरपोर्टही समुद्रावर बनवण्यात आलं आहे. यासारखं सियोलचं नवं एअरपोर्ट आणि चीनमधील मकाऊचं एअरपोर्ट समुद्रावर भर करून बनवण्यात आलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.