www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तिकीट विन्डोवर लांबच लांब रांगा, बिघडलेल्या कूपन मशिन, अशा त्रासातून आता मुंबईच्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मुक्तता होणार आहे. पण त्यासाठी तुम्हांला पुढील सहा महिने वाट पाहावी लागणार आहे.
उपनगरीय रेल्वेचे तिकिट आता मोबाईलवर मिळण्यासाठी रेल्वे प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत तंत्रज्ञान विकसित करून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास तिकीट विन्डोवरील लांबलचक रांगांपासून प्रवाशांची सुटका होणार आहे.
मुंबईच्या लोकलने प्रवास करायचा असेल तर तिकिटाची लांबच लांब रांग पाहून अंगावर काटा येतो. तिकीट मिळण्यासाठी कधी-कधी २० ते ३० मिनिटं रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. या कटकटीतून सुटका करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने नव्या योजना आखल्या आहेत.
उपनगरीय प्रवाशांच्या अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी नवीन वेबसाइट, अॅप्स उपलब्ध करण्यात येणार असल्याची ग्वाही रेल्वे बोर्डाचे सदस्य देवीप्रसाद पांडे यांनी मंगळवारी दिली. पांडे यांनी सीएसटी येथे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यामध्ये या सर्व सुविधांवर विचार झाला. त्यात, दोन्ही रेल्वे महाव्यवस्थापक हेमंत कुमार, सुनीलकुमार सूद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम, शैलेंद्रकुमार, मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन, अतुल राणे आदी उपस्थित होते.
यावेळी पांडे यांनी उपनगरीय मार्गावर मोबाइलवर तिकीट मिळण्याबाबत तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे स्पष्ट केले. येत्या पाच ते सहा महिन्यांत त्याचा वापर प्रवाशांना करता येणे शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी विशिष्ट प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जात असून, विनातिकीट प्रवाशांनी त्याचा गैरफायदा उचलू नये, यासाठी काळजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.