'सामना'चा वार कोणावर?, तिखट शब्दात टीकास्त्र

पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून सरकार आणि विरोधक दोघांवरही अतिशय तिखट शब्दात टीकास्त्र सोडलंय. 

Updated: Jul 13, 2015, 10:03 AM IST
'सामना'चा वार कोणावर?, तिखट शब्दात टीकास्त्र  title=

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून सरकार आणि विरोधक दोघांवरही अतिशय तिखट शब्दात टीकास्त्र सोडलंय. 

सामनाच्या अग्रलेखात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. शिवसेना सत्तेसाठी नाही तर जनतेच्या कल्याणासाठी सत्तेत सहभागी झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळं जनतेच्या विरोधात जाणाऱ्यांचा बंदोबस्त करु, असा अप्रत्यक्ष इशारा अग्रलेखातून देण्यात आलाय.. 

पाहूया अग्रलेखात काय म्हटलंय ते... 

शिवसेनेचा जन्म हा केवळ सत्तेसाठी नाही. आम्हाला सत्ता हवी आहे ती लोककल्याण, महाराष्ट्राची अस्मिता व राष्ट्राच्या रक्षणासाठी. त्यामुळे याबाबत काही वाकडेतिकडे झाल्यास आम्ही डोळे मिटूनही गप्प बसणार नाही. शत्रूंचा समाचार घेऊ व लोकांच्या अंगावर येऊन चावणार्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करू, असे थेट इशारा 'सामना'च्या अग्रलेखात दिला आहे.

अर्जुनाने डोळे मिटूनच माशाचा डावा डोळा फोडला होता व रावणाने डोळे उघडे ठेवून उचललेले शिवधनुष्य त्याच्याच छाताडावर पडले होते. समझनेवालों को इशारा काफी है!, असेही अग्रलेखात बजावण्यात आले आहे.

कुत्रे पिसाळले! डोळे मिटले तरी...काही लोकांना डोळे उघडल्यावर हिंदुस्थानच्या खदखदणार्‍या सीमा दिसतात. पाकड्यांचा सदैव सुरू असलेला विश्‍वासघात दिसतो. ज्यांना प्रखर राष्ट्रवादाची व देशभक्तीची दृष्टी आहे त्यांना हेच दिसणार व दिसत राहणार. हा दृष्टिदोष नसून संस्कार आहे, तर काही लोकांना दिवस-रात्र फक्त ‘गटारे’ दिसतात, असा टोलाही लगावण्यात आलाय.

महाराष्ट्रात आणि देशातही सध्या जो गोंधळ चालला आहे तो पाहता ‘कालचा गोंधळ बरा होता’ अशी भावना लोकात निर्माण होऊ नये. हल्ली जशा फक्त भ्रष्टाचाराच्याच बातम्या दिसतात तशा पिसाळलेल्या कुत्र्यांच्याही बातम्या दिसू लागल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या टाकळी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने शुक्रवारी रात्री धुमाकूळ घातला. ३८ जणांना चावा घेऊन जखमी केले. आता या पिसाळलेल्या कुत्र्यांचे 
काय करायचे? डोळे न मिटता पिसाळलेल्या कुत्र्यांवर पहारा करीत बसावे की मुंबईत ज्याप्रमाणे ‘लेप्टो’ आजार पसरण्यास कारणीभूत ठरलेल्या उंदरांना मारण्याची मोहीम सुरू आहे तशी पिसाळलेल्या व चावणार्‍या कुत्र्यांना मारण्याची मोहीम सरकारने सुरू करावी? काही लोक न पिसाळताही चावतात व असे चावणे हा ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा परिणाम आहे काय, यावर नामदार चंद्रकांत पाटील यांनी प्रकाश टाकला पाहिजे, असा सल्लाही अग्रलेखात देण्यात आलाय. 

राष्ट्रवादी व काँग्रेसवाल्यांना अजूनही वाटतेय की महाराष्ट्रातील सत्ता त्यांच्याच हाती आहे. सत्तेचे तेज व चकाकी आजही त्यांच्या लोंबणार्‍या गालफटांवर दिसते आहे, पण विद्यमान सत्ताधारी विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर पडून महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व देणार नसतील तर आपल्यासारखे दुर्दैवी दुसरे कोणीच नाही. विरोधी पक्षाच्या हाती जी प्रकरणे आज लागली आहेत ते काही त्यांचे संशोधन व मेहनत नक्कीच नाही. त्यामागचे कर्तेधर्ते कुणी वेगळेच आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर उद्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधकांच्या हाती जे ‘फटाके’ किंवा ‘दारूगोळा’ दिसत आहे तो त्यांच्या हाती आयताच मिळाला आहे, असा सूचक इशारा देण्यात आलाय. 

काँग्रेसचे राज्य असताना ते शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाहीत, सातबारा कोरा करून कर्जमाफी देऊ शकले नाहीत. ते कॉंग्रेस-राष्ट्रवादी नामक सध्याचे विरोधी पक्ष त्याच मागण्यांसाठी जोर लावीत आहेत ही गंमतच नाही काय? महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न आम्ही नव्हे तर भाजपच्याच मंत्र्यांनी उचलला आहे. आता त्यांचीही दृष्टी बिघडली आहे, असे कुणास वाटत असेल तर हद्द झाली. आजपासून सुरू होणार्‍या अधिवेशनात चिक्की प्रकरण, राज पुरोहित-लोढा यांचे ‘सीडी’ प्रकरण, मंत्र्यांचे ‘डिग्री’ प्रकरण, गृहराज्यमंत्र्यांच्या ‘नावा’चा घोळ असे अनेक विषय येतील व संपूर्ण अधिवेशन पुन्हा गोंधळात वाहून जाईल. फडणवीस सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर चालले आहे व शिवसेनेला लोकांना जाब द्यावा लागेल, अशी परिस्थिती आहे. शिवसेनेचा जन्म फक्त सत्तेसाठी नसून आम्हाला सत्ता हवी आहे ती लोककल्याण, महाराष्ट्राची अस्मिता व राष्ट्राच्या रक्षणासाठी, असे अग्रलेखात म्हटले आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.