www.24taas.com,मुंबई
तुम्ही होळी खेळत असाल तर सावधान.... ‘होळी रे होळी... पुरणाची पोळी...’ अशा आरोळ्या देत होळी खेळली जाते. पण हे करीत असताना सावधान राहिले पाहिजे! रंगाचा बेरंग होईल. कारण धावत्या लोकलवर किंवा महिलांवर पाण्याने भरलेले फुगे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या माराल तर तुमची होळी बिन भाड्याच्या खोलीत म्हणजे जेलमध्ये काढावी लागेल.
होळी सणात अनेकजण धावत्या लोकलवर फुगे मारण्याचा खोडसाळपणा करतात. यामुळे प्रवाशांना इजा होण्याचा धोका असतो. याची गंभीर दखल घेऊन फुगे मारण्याचा आगाऊपणा करणार्यांना जेरबंद करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सापळा रचला आहे. त्यामुळे रंगा फुगा तुम्हाला दगा देऊ शकतो.
यापूर्वी लोकलवर फुगे मारण्याचे प्रकार जिथे घडलेत त्या ठिकाणांवर आम्ही विशेष लक्ष ठेवले आहे. रेल्वे स्थानक आणि झोपडपट्टी लागून असलेल्या रेल्वेच्या हद्दीत गस्त वाढवली आहे. फुगे मारताना कोणी सापडलाच तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस उपायुक्त बन्सीधर शिरसाठ यांनी सांगितले.
होळी खेळून आलेला तसेच रंगात रंगून कोणी उगाचच रेल्वे स्थानकात अथवा रेल्वेच्या हद्दीत फिरताना सापडलाच तर अशा रंग बहाद्दरांना पोलीस ‘१५१ सीआरपीसी’नुसार ताब्यात घेणार आहेत. त्यांनाही २४ तास पोलीस कोठडीत ‘मुक्काम’ करावा लागेल.
अतिउत्साहीपणात तुमच्याकडून कुणाला दुखापत झालीच तर १५१ (३) नुसारदेखील कारवाई केली जाईल, असा इशारा रेल्वे पोलिसांनी दिला आहे. मग थेट १४ दिवस पोलीस कोठडीचा पाहुणचार करावा लागेल. त्यामुळे खबरदारी घ्या, फुगे मारू नका.