मार्केटचा विघ्नहर्ता... डॉ. रघुराम राजन?

गेल्या काही महिन्यांपासून बिघडलेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सावरू लागलीय... आयसीयूमध्ये गेलेल्या अर्थव्यवस्थेची तब्येत पुन्हा सुधारू लागली असून, हा `डॉक्टर रघुराम इफेक्ट` असल्याचं सांगितलं जातंय. अर्थव्यवस्थेच्या सुधारलेल्या तब्येतीवर हा एक दृष्टीक्षेप...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 12, 2013, 08:38 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या काही महिन्यांपासून बिघडलेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सावरू लागलीय... आयसीयूमध्ये गेलेल्या अर्थव्यवस्थेची तब्येत पुन्हा सुधारू लागली असून, हा `डॉक्टर रघुराम इफेक्ट` असल्याचं सांगितलं जातंय. अर्थव्यवस्थेच्या सुधारलेल्या तब्येतीवर हा एक दृष्टीक्षेप...
शेअर बाजाराचा निर्देशांक उसळी घेतोय... रूपयाची घसरण थांबलीय आणि रूपया पुन्हा बाळसे धरतोय... सोन्याच्या किंमती कमी झाल्यात आणि विदेशी व्यापारातील वित्तीय तुटीचे प्रमाण कमी झालंय. भारताच्या अर्थकारणात अचानक तेजी आलीय. ही किमया घडवणाऱ्या जादूगाराचं नाव आहे डॉ. रघुराम राजन... रिझर्व्ह बँकेचे नवे गर्व्हनर. त्यांनी गर्व्हनरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जादूची कांडी फिरावी, तसा चमत्कार घडलाय.
मे महिन्यापासूनच अमेरिकी डॉलरपुढे रूपयाने गुडघे टेकले होते. डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत ६८ रूपयांवर पोहोचली होती. म्हणजे रूपयाच्या किंमतीत २७ टक्क्यांची घसरण झाली. डॉ. राजन यांनी आल्या आल्या रूपयाची स्थिती सावरण्यासाठी उपाय आखले. या उपचारांची मात्रा बरोबर लागू पडली. रूपया आता सावरला असून, सध्या त्याची किंमत प्रति डॉलर ६३ रूपयांच्या घरात आलीय.
शेअर बाजारातही सध्या चैतन्य आलंय. मंगळवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ७२७ अंशांची उसळी घेतली होती. मोठ्या गुंतवणूकदारांनी पुन्हा भांडवली बाजाराकडे मोर्चा वळवल्याने सोन्याच्या किंमतीतही ७३३ रूपयांची घसरण झाली.
सीरियाचा प्रश्न
सीरियावर युद्धाचे ढग जमू लागताच कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमती भडकण्याची शक्यता होती. पण, युद्धाचे ढग निवळताच कच्च्या तेलाच्या किंमतीही उतरल्यात. सीरियाचा प्रश्न राजकीय मुत्सद्देगिरीने सुटण्याची शक्यता निर्माण होताच भारतीय शेअर बाजारात त्याचे सकारात्मक पडसाद उमटू लागलेत.

रूपयाची बळकटी, भारतीय निर्यातीत झालेली वाढ आणि सेन्सेक्समधली तेजी यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नवी पालवी फुटलीय. तेजीचा हा माहोल कायम राहण्याची चिन्हे दिसत असून, डॉ. रघुराम राजन हे त्यादृष्टीने `विघ्नहर्ता`च ठरले आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.