www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच्या शरद पवारांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नियमबाह्य कामं असल्यानं विचार करावा लागतो असं सांगत त्यांनी पवारांना टोला हाणलाय.
आपण नेहमी धोरणात्मक निर्णयांना प्राधान्य देतो. मात्र काही बाबतीत निर्णय घेताना विचार करावा लागतो. कारण शेवटी आघाडी सरकार चालवायचे असल्याचं त्यानी नमूद केलं. तसंच आपल्यावर कुणाचाही दबाव नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मात्र पवारांना योग्य वेळी योग्य उत्तर देणार असल्याचा इशाराही देण्यासही मुख्यमंत्री विसरले नाहीत.
सध्या प्रशासनातल्या लोकांना लकवा मारला असून फायलींवर सह्या करताना त्यांचे हात थरथरतात अशी बोचरी टीका काल पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधले राष्ट्रवादीचे नेतेही मुख्यमंत्र्यांना टीकेचं लक्ष्य करु लागलेत. पिंपरी-चिंचवडमधल्या अनधिकृत बांधकामासह इतर प्रश्नांकडे मुख्यमंत्री दुर्लक्ष करत असल्याची टीका स्थानिक नेते करतायत. चव्हाणांनी मात्र पवारांना आज खरमरीत उत्तर दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.