झवेरी बाजारात ३४ सराफांच्या पेढींवर छापे

दिवाळीच्या तोंडावर आणि धनत्रयोदशी या दिवशी झवेरी बाजारातील सोन्याची खरेदी विक्री उच्चांक गाठत असते. मात्र, काही सराफ दुकानदार ‘बाजार’ करतात. याला लगाम घालण्यासाठी आयकर विभागाने ३४ सराफांच्या पेढींवर छापे मारून दिवाळीचा धमाका उडवून दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 11, 2012, 09:51 AM IST

www.24taas.com,मुंबई
दिवाळीच्या तोंडावर आणि धनत्रयोदशी या दिवशी झवेरी बाजारातील सोन्याची खरेदी विक्री उच्चांक गाठत असते. मात्र, काही सराफ दुकानदार ‘बाजार’ करतात. याला लगाम घालण्यासाठी आयकर विभागाने ३४ सराफांच्या पेढींवर छापे मारून दिवाळीचा धमाका उडवून दिलाय.
आयकर विभागाने झवेरी बाजारातील ३४ सराफांच्या पेढींवर छापे घालून २२ कोटींचे बेहिशेबी सोने आणि रोख रकमेचे व्यवहार उघडकीस आणले आहेत. या छाप्यात हवाला रॅकेट चालवणाऱ्या अंगाडीयांचीही चौकशी करण्यात येत आहे.
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी झवेरी बाजारातील सोन्याची खरेदी विक्रीचा उच्चांक होतो. धनत्रयोदशीच्या आधीच आयकर विभागाने झवेरी बाजाराभोवती पाश आवळण्यास सुरूवात केली. शुक्रवारी रात्रीपासून या कारवाईला सुरूवात झाल्यानंतर काही तासातच बड्या सराफांचे लॉकर खोलून आयकर विभागाने पाच कोटींच्या बेहिशेबी सोन्याची चौकशी सुरू केली. ही कारवाई शनिवारी सुरू होती.
या कारवाईत बेहिशेबी व्यवहारांचा आकडा २२ कोटींच्याही पुढे गेला. छाप्यांमध्ये सोने खरेदी—विक्रीच्या व्यवहारांबाबतची आक्षेपार्ह कागदपत्रे आयकर विभागाने ताब्यात घेतली आहेत. हवाला रॅकेट चालवणाऱ्या अंगाडीयांचा बेकायदेशीर व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचीही चौकशी करण्यात येत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.