गर्दुल्ल्यांची गुन्हेगारी, पोलिसांची लाचारी

गेल्या काही दिवसांमधील घटना पाहता गर्दुल्यांची वाढती गुन्हेगारी मुंबईकरांची डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. फोफावलेले ड्रग्जमाफिया आणि निष्क्रिय पोलीस प्रशासन. यामुळं गर्दुल्यांचे फावत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 25, 2013, 04:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
गेल्या काही दिवसांमधील घटना पाहता गर्दुल्यांची वाढती गुन्हेगारी मुंबईकरांची डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. फोफावलेले ड्रग्जमाफिया आणि निष्क्रिय पोलीस प्रशासन. यामुळं गर्दुल्यांचे फावत आहे. परंतु हेच गर्दुल्ले आता मोठ्या गुन्ह्यांकडे वळत असल्यानं पोलीस आता तरी ड्रग्जमाफियांना आळा घालणार का, असा प्रश्न विचारला जातोय.
मुंबईत 18 ऑगस्टला चालत्या लोकलमध्ये अमेरिकन महिलेवर ब्लेडने झालेला हल्ला असो किंवा 22 ऑगस्ट रोजी शक्ती मिल कंपाऊंडमध्ये महिला फोटो जर्नालिस्टवर झालेला सामुहिक बलात्कार...समान धागा एकच, गर्दुल्यांचा या गुन्ह्यातील सहभाग... आतापर्यंत ड्रग्जसाठी छोट्यामोठ्या चो-या करणा-या गर्दुल्यांचा मोठे गुन्हे करण्याकडं वाढता कल मुंबईकरांची चिंता वाढवणारा आहे.
मुंबईत गर्दुल्यांच्या वाढत्या संख्येमागे इथं सहजपणे कुणालाही मिळणारं ड्रग्ज. ना कायद्याचा धाक, ना कुठली कारवाई. वेळच्या वेळी संबंधितांना हप्ते पोहचते झाले की ड्रग्ज माफियांना रान खुले. म्हणून तर खुलेआम फूटपाथवर बसून ड्रग्ज घेण्याचं धाडस गर्दुले करतात.
खाकी वर्दीचा धाक मुंबईत का राहिला नाही याचे स्पष्टीकरण आवश्यक आहे. ड्रग्जचा विषय चर्चेत आला की पोलिसांकडून चार दिवस कारवाईचं नाटकही होईल. परंतु चार दिवसानंतर पुन्हा पहिले पाढे पंच्चावन...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.