'कंगाल' आयसीसच्या निशाण्यावर 'मालामाल' बॉलिवूड!

आयसीस या दहशतवादी संघटनेनं भारतीय सुरक्षा यंत्रणांची झोप उडवलीय. गेल्या दीड वर्षांपासून ते भारतात पाय पसरवण्याचा प्रयत्न करतायत. त्यातच आता बॉलिवूडही आयसीसच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळतेय.

Updated: May 25, 2016, 08:41 PM IST
'कंगाल' आयसीसच्या निशाण्यावर 'मालामाल' बॉलिवूड! title=

मुंबई : आयसीस या दहशतवादी संघटनेनं भारतीय सुरक्षा यंत्रणांची झोप उडवलीय. गेल्या दीड वर्षांपासून ते भारतात पाय पसरवण्याचा प्रयत्न करतायत. त्यातच आता बॉलिवूडही आयसीसच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळतेय.

'लार्जर दॅन लाईफ'

मुंबई मायानगरीची जगाला भुरळ पडण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इथलं बॉलीवूड... 'लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा रंगवणारे सिनेमे इथल्या चित्रपट सृष्टीत तयार होतात. अर्थातच त्यामुळं घसघशीत कमाई होते. सुपर डुपर हिट सिनेमे १०० कोटी, २०० कोटी, ३०० कोटींच्या कमाईची उड्डाणं करतात.

'मालामाल' बॉलिवूड

मालामाल चित्रपटसृष्टी अशीच या बॉलीवूडची ओळख... त्यामुळंच नव्वदीच्या दशकात या चित्रपटसृष्टीची भुरळ गुन्हेगारी टोळ्यांना पडली नसती तरच नवल... दाऊद इब्राहीम, छोटा शकील, अबू सालेम, छोटा राजन आणि नंतरच्या काळात रवी पुजारी या गुंडांच्या टोळ्यांनी बॉलीवूडमध्ये खंडणी वसुली केली. विविध सुपरस्टारना खंडण्यांसाठी धमक्या दिल्या जायच्या. मात्र, अंडरवर्ल्डचा प्रभाव मुंबईतून कमी होत गेला तसं बॉलीवूडवरचं गुन्हेगारी टोळ्यांचं मळभही हटत गेलं. 

'आयसीस'समोर आर्थिक विवंचना

आता पुन्हा एकदा बॉलीवूडला टेन्शन दिलंय ते आयसीस या कुख्यात दहशतवादी संघटनेनं... आयसीसीसनं बॉलिवूडवर लक्ष केंद्रित केलंय. रिझवाननुद्दीन उर्फ खालीद आणि मुद्दबीर शेख या दोघा संशयित आयसीस हस्तकांच्या चौकशीत ही माहिती पुढे आलीय. आयसीस सध्या प्रचंड आर्थिक विवंचनेत सापडलीय. पैशांसाठी त्यांनी आपला मोर्चा बॉलीवूडकडं वळवलाय.

बॉलीवूड कलाकारांनी मात्र ही चिंतेची बाब नसल्याचं स्पष्ट केलंय. आम्हाला पुरेशी सुरक्षा व्यवस्था दिली जाते, अशी प्रतिक्रिया  नसरूद्दीन शाह, राधिका आपटे, कल्की कोचलीन आणि इतर कलाकारांनी दिलीय.

मुंबई नेहमीच दहशतवाद्यांचं टार्गेट राहिलीय. आता मुंबईतल्या बॉलीवूडवरही दहशतवादी संघटनांचीही वक्रदृष्टी पडलीय. ही चिंतेची बाब आहेच, शिवाय बॉलिवूडसाठी धोक्याची घंटादेखील आहे...