www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
बॉलिवूडच्या एक नाही दोन नाही तर सुमारे १०० अभिनेत्री तसेच टॉपच्या मॉडेल्सना अश्लिल मेसेज पाठवून छळणाऱ्या एका विकृत तरुणाला मुंबई क्राइम ब्रँच युनिट आठने कर्नाटकमधील मंगळूर येथून अटक केली आहे. गेले वर्षभर जवळपास तब्बल चार हजार अश्लिल मेसेज त्याने सुमारे १०० अभिनेत्रींनी पाठवले होते.
सिनेअभिनेत्रींना वारंवार अश्लिल मेसेज येण्याचे प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू होते. या मेसेजमुळे त्रस्त झालेल्या एका आघाडीच्या नायिकेने त्याबाबतची तक्रार गेल्या आठवड्यात सह पोलिस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांच्याकडे केली होती. त्यानंतर युनिट आठचे सीनिअर इन्स्पेक्टर दीपक फटांगरे यांच्या पथकाने या मेसेजचा माग काढत हरीशला अटक केली.
पदवीधर हरिशने कम्प्युटर इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केलेला आहे. त्याचा फोन आणि लॅपटॉप जप्त केल्यानंतर तो गेले वर्षभर एक दोन नव्हे तर तब्बल १०० सिनेतारकांना हे मेसेज पाठवत होता, असे निष्पन्न झाले आहे. तसेच, त्याच्या लॅपटॉपमध्ये अनेक अभिनेत्रींचे फोटोही आढळले आहेत. हे मेसज पाठविण्यासाठी त्याने बोगस कादगपत्रांच्या सहाय्याने दोन सिम कार्ड घेतले होते. त्या कार्डचा वापर फक्त रात्रीच्या वेळी मेसेज पाठविण्यासाठी तो करायचा. मोबाइल डॉट कॉम ही वेबसाइट आणि फेसबुक अकाऊंटवरून त्याने हे नंबर मिळवले होते. मात्र, त्यापैकी अनेक फोन हे त्या तारकांचे नव्हतेच. त्यामुळे अश्लिल मेसेजचा फटका सर्वसामान्यांनाही बसत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.