बिचाऱ्या नगरसेवकांना ड्रायव्हरचाही खर्च परवडेना!

मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ पालिका अधिकारी दर महिन्याला पेट्रोल-डिझेलवर लाख-सव्वा लाख रूपयांचा खर्च करतात. आता त्यांच्याप्रमाणे आपणालाही ड्रायव्हरसह पेट्रोल-डिझेलचा खर्च मिळावा, यासाठी नगरसेवकही हट्ट धरून बसलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 11, 2013, 05:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ पालिका अधिकारी दर महिन्याला पेट्रोल-डिझेलवर लाख-सव्वा लाख रूपयांचा खर्च करतात. आता त्यांच्याप्रमाणे आपणालाही ड्रायव्हरसह पेट्रोल-डिझेलचा खर्च मिळावा, यासाठी नगरसेवकही हट्ट धरून बसलेत.
काँग्रेसचे केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली हे इंधनावरचा खर्च वाचवण्यासाठी राजधानी दिल्लीत मेट्रोने प्रवास करताना दिसत आहेत... आणि इकडे देशाच्या आर्थिक राजधानीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी इंधनाची उधळपट्टी चालवलीय. मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना आता पेट्रोल-डिझेलचा खर्च वाढवून हवाय. आयुक्त सीताराम कुंटेंसह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पेट्रोल-डिझेलवर दर महिन्याला लाख-सव्वा लाख रूपयांचा खर्च करतात. मग लोकांमधून निवडून येऊनही आमच्या बाबतीत दुजाभाव का? असा सवाल राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी केलाय.
राष्ट्रवादीच्या गटनेत्यांच्या या आरोपावर अधिकारी तोंड उघडायला तयार नाहीत. महापौर सुनील प्रभू यांनी नगरसेवकांचा मात्र हा आरोप खोडून काढलाय. मुंबईकरांची सेवा करणाऱ्या या नगरसेवकांना गेल्या एप्रिल महिन्यात सोनी कंपनीचे ४५ हजार रूपयांचे लॅपटॉप देण्यात आले. जून २०१३ मध्ये १३ हजार रूपयांचे सॅमसंगचे अँड्रॉईड स्मार्टफोन खिरापतीसारखे वाटले. मुंबईकरांच्या करांच्या पैशावरच परदेशवारी करण्याचा पालिका गटनेत्यांचा मनसुबा होता. पण त्यावर टीका झाल्यानं अखेर स्वतःच्या खिशातून परदेश वारी करण्यात आली. हे कमी झाले म्हणून की काय, आता नगरसेवकांना महिन्याचा पेट्रोल-डिझेलचा आणि ड्रायव्हरचा खर्च वाढवून हवाय.

मुंबईतले खड्डे बुजवून बिच्चारे हे नगरसेवक किती थकलेत... कामं राहिली बाजूला, पण मोठमोठी होर्डिंग्ज लावून ते दमले असतील…! मग, त्यांच्या दिमतीला मुंबईकरांच्या पैशातून गाड्या फिरवण्यासाठी इंधन द्यायलाच हवं ना! खरं तर मुंबईकरांची सेवा करून करून दमल्या-भागलेल्या या नगरसेवकांवर केरळीय आयुर्वेदिक उपचार व्हायला हवेत. त्यांच्यासाठी मोफत मसाज आणि स्पा पार्लरची मेंबरशीपही द्यायला हवी... स्पेशल जिम आणि इन्स्ट्रक्टर नेमायला हवेत... नगरसेवकांचा इतना तो हक बनता है यार... होय ना?

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.