मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार, मेटे-फडणवीस यांची भेट

भाजपने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांची भेट झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवरून मराठा आरक्षणावरून राजकीय वादळ उठण्यास सुरूवात झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 8, 2013, 02:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांची भेट झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवरून मराठा आरक्षणावरून राजकीय वादळ उठण्यास सुरूवात झाली आहे.
या भेटीच्या दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. दोन्ही पक्ष निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षणाचं राजकारण करत असल्याचा हल्लाबोल फडणवीस यांनी केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काँग्रेसनं अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. आता भाजपनं मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आणि मेटे भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप मराठा संघटनांनी केलाय. मराठ्यांसह समाजातील सगळ्याच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली होती. ती मान्य नसल्याचं सांगत मराठ्यांना सरसकट आरक्षणाची मराठा संघटनांची मागणी आहे.
पुण्यात झालेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत शरद पवारांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची गरज व्यक्त केली. दलित, ओबीसी तसेच आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर सर्व आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा असं पवारांनी म्हटलं होतं.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षणाचा पुन्हा मुद्दा पुढे आला आहे. या आधी लोकसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा मांडला आहे. एका प्रश्नाच्या आधारे मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावं, यासाठीचा प्रस्ताव राष्ट्रीय मागासवर्गीय आय़ोगाच्या सल्ल्यासाठी पाठवण्यात आल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. जातीमध्ये विभागणी करून राज्यकर्ते मराठी माणसाची माथी भडकवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचीच नव्हे, तर महापुरूषांचीही या लोकांनी विभागणी केल्याचं राज ठाकरेंनी दाखवून दिलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.