'घुमान'ला होणाऱ्या साहित्य संमेलनानं प्रकाशकांना सुटला घाम

८८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधल्या घुमानला घेण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतलाय. त्यामुळे प्रकाशक नाराज आहेत.

Updated: Jul 3, 2014, 09:40 PM IST
'घुमान'ला होणाऱ्या साहित्य संमेलनानं प्रकाशकांना सुटला घाम title=

मुंबई : ८८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधल्या घुमानला घेण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतलाय. त्यामुळे प्रकाशक नाराज आहेत.

पंजाबमध्ये मराठी भाषकांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे ग्रंथविक्रीस फारसा वाव नाही. त्यामुळे या संमेलनाला अनेक प्रकाशकांची गैरहजेरी लागण्याची शक्यता आहे. 

संत नामदेवांची कर्मभूमी असणाऱ्या घुमानला यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संत नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी पंजाब इथे धार्मिक, अध्यात्मिक कार्य केलं. त्याला प्रणाम करण्यासाठी हे संमेलन घुमान इथे होतंय. मात्र, या निर्णयामुळे प्रकाशक नाराज झालेत. संत नामदेवांच्या कर्मभूमी घुमान आणि आसपासच्या परिसरात मराठी भाषकांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे या संमेलनाला कितीसे मराठी भाषक येतील? आणि आले तर प्रदर्शनाला फिरकतील का? अशी शंका प्रकाशक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे घुमानची निवड करताना अध्यात्मिक बाजूसोबत वाड्मयीन बाजू का लक्षात घेतली नाही? असा सवाल प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अरुण जाखडे यांनी केलाय. 

प्रत्येक साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शनाचं आगळं वेगळं महत्त्व असतं. इथे ग्रंथ विक्रीतून उलाढालही मोठी होते. मराठी साहित्याची एकगठ्ठा उलाढाल साहित्य संमेलनाशिवाय इतर वेळी क्वचितच होते. मात्र, या बाबींचा विचारच झाला नाही अशी प्रकाशकांची तक्रार आहे. त्यामुळे या संमेलनालाच न जाण्याचा अनेक प्रकाशकांचा विचार आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.