www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘म्हाडा’नं आपल्या सोडतीसाठी आणि अर्ज भरण्यासाठीची तारीख वाढवून ग्राहकांना सुखद धक्का दिला होता. मात्र, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ज्या अर्जदारांनी म्हाडाची वेबसाईट उघडली... त्यांच्या पदरात मात्र निराशाच पडली.
कारण, तारखा वाढवल्याचं म्हाडानं जाहीर तर केलं... पण, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया वेबसाईटवर अपडेट करण्याचं मात्र म्हाडा अधिकारी साफ विसरले. ७ जूनपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख म्हाडानं जाहीर तर केलं... पण, जुन्या वेळापत्रकानुसार ३० मे रोजीच म्हाडाच्या वेबसाईटवर अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिसली. वेबसाईटवर अर्ज भरण्याची प्रक्रियाच बंद पडली. नवे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर त्यानुसार वेबसाइटमध्ये बदल करण्याचं भानच अधिकार्यांदना राहिलं नाही. त्यामुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत चांगलाच गोंधळ उडाला.
१५ जून रोजी जाहीर होणाऱ्या सोडतीसाठी २८ मे रोजी नोंदणीची अंतिम मुदत होती, तर अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० मे अशी होती. त्याचवेळी डीडीसह अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २ जून होती. या वेळापत्रकानुसारच म्हाडानं आपल्या वेबसाईटवर अर्ज भरण्याची प्रक्रिया तयार केली होती. मात्र बुधवारी घरांच्या किमतीत घट करीत संपूर्ण अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार नोंदणी ६ जूनला, अर्ज भरणे ७ जूनला तर अर्ज सादर करणे ९ जूनला बंद होणार आहे. हे नवे वेळापत्रक वेबसाइटवर अपडेट झालं... पण, रजिस्ट्रेशनची प्रक्रियाच बंद पडली. नव्या वेळापत्रकानुसार वेबसाइटमध्ये बदल करण्याचा विसर पडल्याने ‘लॉटरी नॉट येट लॉन्च - लास्ट डेट ऑफ अॅप्लिकेशन इज ओव्हर’ असा संदेश वेबसाइटवर दिसला. म्हाडाच्या या अजब कारभाराचा मोठा फटका अर्जदारांना आणि म्हाडालाही बसला. आता मात्र पुन्हा रजिस्ट्रेशन आणि पुढची प्रक्रिया सुरू झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.