मनसे-भाजपचा शेकहँड, राज ठाकरे-शेलार 'गुलाब' भेट

आज दादरमध्ये एक भेट झाली. या भेटीमुळे सहाजिक चर्चा सुरू झालीय. काही दिवसांपूर्वी एकमेकांची ज्यांनी सालटी काढली, त्यांनीच आज गळाभेट घेतली. कृपया डोळे चोळू नका, मनसैनिक आणि शिवसैनिकांनो मन घट्ट करा, कदाचित ही दृश्यं तुम्हाला विचलित करु शकतील, आम्ही सांगणार आहोत, एक भेटलेल्या दोन नेत्यांची. तर गुरुवार दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांची ही  ताजी भेट. 

Updated: Nov 13, 2014, 11:02 PM IST
मनसे-भाजपचा शेकहँड, राज ठाकरे-शेलार 'गुलाब' भेट title=

मुंबई : आज दादरमध्ये एक भेट झाली. या भेटीमुळे सहाजिक चर्चा सुरू झालीय. काही दिवसांपूर्वी एकमेकांची ज्यांनी सालटी काढली, त्यांनीच आज गळाभेट घेतली. कृपया डोळे चोळू नका, मनसैनिक आणि शिवसैनिकांनो मन घट्ट करा, कदाचित ही दृश्यं तुम्हाला विचलित करु शकतील, आम्ही सांगणार आहोत, एक भेटलेल्या दोन नेत्यांची. तर गुरुवार दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांची ही ताजी भेट.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित आमदार आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी कृष्णकुंजवर आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकालानंतर आशिष शेलार यांनी कृष्णकुंजची केलेली ही बहुदा पहिलीच वारी. सुमारे सव्वा तास आशिषराव आणि राजसाहेबांची मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये काय झालं. ते त्या दोघांनाच माहीत. कारण आम्ही बूम पुढे केल्यावर दोघांनीही बोलायला नकार दिला. पण माध्यमांच्या कॅमे-याच्या फ्रेममध्ये एकत्र दिसतील, याची काळजी दोघांनीही आवर्जून घेतली. आता दोघांची भेट झाली म्हणजे चर्चा तर होणारच. किंबहुना ती चर्चा व्हावी. यासाठीच ही भेट असू शकते.

भाजप-मनसेचा शेकहँड

सध्याच्या परिस्थितीचा लेखाजोखा मांडला तर राज ठाकरेंना शिवसेनेशी सलगी नको आहे. आणि दुसरीकडे भाजपला सतत शिवसेनेला दबावाखाली ठेवायचंय. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. या न्यायानं मनसे आणि भाजपनं शेकहँड करायला सुरुवात केलीय. याला भीतीचं राजकारण म्हणा. दबावाचं म्हणा. मैत्री म्हणा किंवा निव्वळ टाईमपास म्हणा. पण सोन्याची कोंबडी असेलली मुंबई महापालिका टार्गेट ठेवून हे सगळं सुरू झालंय. राज्यात सेना-भाजपनं वेगवेगळे पाट मांडल्यावर महापालिकेत शिवसेनेला एकाकी पाडण्याची खेळी भाजपनं आधीच सुरू केलीय.

डेंग्यूच्या मुद्द्यावर महापालिकेत भाजपनं मनसेबरोबर सभात्याग केला. आणि दुस-याच दिवशी आशिष शेलार कृष्णकुंजवर पोहोचले. याला राजकीय योगायोगच म्हणावा लागेल. महापालिकेची या तीन पक्षांची गणितं मांडली तर शिवसेना-७५ भाजप -३१ मनसे-२७ असं संख्याबळ आहे. त्यामुळे २७ नगरसेवक मिरवणा-या राज ठाकरेंना त्यांची वट कायम ठेवायचीय. आणि शिवसेना माझ्याकडे मदत मागायला कशी येईल, याचेच मनसुबे ते रचत असतील.

भरडला जाणारा कार्यकर्ता
हे सगळं झालं राजकारणाचं.... पण या सगळ्यामध्ये भरडला जाणारा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे कार्यकर्ता...... विधानसभा निवडणुकीआधी एकमेकांची सालटी काढणारे अचानक एकमेकांची गळाभेट घेतात... हे कार्यकर्त्यानं कसं पचवायचं.... जेव्हा कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येनं तुम्हाला भेटायला येतात, त्या शेकडो कार्यकर्त्यांना जेमतेम तासभराचा वेळ देत राजसाहेब भेट आटोपती घेतात... त्याच राजसाहेबांना आशिष शेलारांशी चर्चा करण्यासाठी सव्वा तास वेळ काढला. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकरांना अर्धा तास वेळ दिला. त्यांची भेट घेताना मात्र राज ठाकरेंचा चेहरा गुलाबाच्या ताटव्यासारखा फुलला होता.

प्रश्न विचारले की राजकारण वेगळं आणि मैत्री वेगळी, अशी सोयीस्कर उत्तरं द्यायची. कलावंतांचा फौजफाटा बाळगून त्यांच्यात रमायचं. आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली की रुसून बसायचं हा कुठला न्याय. मग नाराज मनसेचे नेते भाजपच्या नेत्यांना भेटत असतील तर त्यात चूक काय?

लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स
या सगळ्याचा हिशोब मांडायचा झाला तर एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स. कारण पुढच्या काळात महापालिका निवडणुकीचं वातावरण तापवण्यासाठी अशा अनपेक्षित भेटीगाठी होतच राहणार. तेव्हा सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनो आताच मन घट्ट करा. आणि राजकारणातला हा टाईमपास ओळखायला शिका.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.