www.24taas.com, मुंबई
मध्य रेल्वेनं प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवलीय. एका भंगार बाईकला अत्याधुनिक सेवांसहित सज्ज करून मध्ये रेल्वेनं एक ‘मोबाईल बाईक’ तयार केलीय. ‘टाकाऊतून टिकाऊ’ ही फक्त घोषणा न देता त्याची अंमलबजावणी करून मध्य रेल्वेनं ही बाईक आपल्या पुणे डिव्हिजनच्या ताफ्यात दाखल करून घेतलीय.
गेली अनेक वर्ष कुणीही दावा न केलेली ही बाईक पुण्याच्या रेल्वे पार्सल विभागात पडून होती. या बाईकला मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाने ती २२ हजार रुपयांत लिलावात विकत घेतली. त्यानंतर या बाईकवरून प्रथमोपचार पोहोचविण्याची संकल्पना समोर आली. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी या बाईकचा उपयोग होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर त्या बाईकचं रुपांतर नव्या बाईकमध्ये करण्यात आलं. त्यासाठी साधारण आठ ते बारा हजार रुपयांपर्यंत खर्च आला.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांच्या हस्ते शनिवारी या पहिल्या मेडिकल मोबाईल बाईकचे अनावरण झाले. या ‘मोबाईल फर्स्ट एड बाईक’ कोणत्याही ठिकाणी आणि अधिक वेगानं प्रवाशांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येणार आहे. पुणे ते दौंड (१४० किमी) आणि पुणे ते कोल्हापूर (२८५ किमी) हा भाग पुणे डिव्हिजनमध्ये येतो. यापैकी अनेक ग्रामीण भागांतून रेल्वेमार्ग जात असल्याने तेथे पोहोचणारे रस्तेही चांगले नाहीत. अशा ठिकाणी कच्च्या रस्त्यांवरून या बाईकवरून वैद्यकीय मदत पाठविणे शक्य होणार आहे.
या बाईकमध्ये अनेक सुधारणा करून त्यावर तीन प्रथमोपचार पेट्या बसविल्या आहेत. त्यामध्ये शस्त्रक्रियेचे साहित्यही अंतर्भूत आहे. अपघातग्रस्त प्रवाशांवर तातडीने उपचार करण्यासाठी सहा कर्मचाऱ्यांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे.