मुंबईत 26 वर्षाच्या मॉडेलची आत्महत्या

 मुंबईत एका 26 वर्षाच्या मॉडेलने आत्महत्या केली आहे. आपल्या प्रियकराकडून झालेल्या विश्वासघातानंतर नैराश्यात अर्चना लक्ष्मीकांत पांडे या मॉडेलने राहत्या घरी आत्महत्या केली.  पोलिसांना या ठिकाणी एक `सुसायड नोट’ सापडली आहे. यात अर्चनाने प्रियकरच तिच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

Updated: Sep 30, 2014, 11:46 AM IST
मुंबईत 26 वर्षाच्या मॉडेलची आत्महत्या title=

मुंबई :  मुंबईत एका 26 वर्षाच्या मॉडेलने आत्महत्या केली आहे. आपल्या प्रियकराकडून झालेल्या विश्वासघातानंतर नैराश्यात अर्चना लक्ष्मीकांत पांडे या मॉडेलने राहत्या घरी आत्महत्या केली.  पोलिसांना या ठिकाणी एक `सुसायड नोट’ सापडली आहे. यात अर्चनाने प्रियकरच तिच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

या आरोपानंतर तिच्या प्रियकराची पोलिसांकडून चौकशी होणार असून चौकशीनंतरच त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. अर्चना पांडे ही अंधेरीतील वर्सोवा, न्यू म्हाडा वसाहतीत राहत होती. जून महिन्यापूर्वी तिने हा फ्लॅट भाडय़ाने घेतला होता आणि सध्या ती तिथे एकटीच राहत होती. 

या फ्लॅटमधून सकाळी तिच्या रुममधून वास येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी ही माहिती रुमच्या मालकासह वर्सोवा पोलिसांना दिली होती. 

या माहितीनंतर वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिथे त्यांना अर्चनाने तिच्या घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला असून तिने तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर तिचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलीस  तपासात अर्चना ही गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे आढळून आले. तिचा भाऊ अश्विनी पांडे याला गुजरात पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्यांत अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 

अर्चनाचा प्रियकर ओमर आसिफ पठाण याने तिचा विश्वासघात केला. या दोघांचेही प्रेमसंबंध असताना त्याचे अन्य एका तरुणीशी प्रेमसंबंध सुरू होते. याच कारणावरुन त्यांच्यात वादही झाला होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी लवकरच ओमर पठाण याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मॉडेल असलेल्या अर्चनाने काही दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. मात्र, तिच्याकडे सध्या काहीच काम नव्हते. दुसरे कुठलेच काम नसल्याने तिने मिर्झा प्रोडक्शन कंपनीत नोकरी सुरु केली होती. तिच्या आत्महत्येमागे हेदेखील एक कारण असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.