मुंबई : अनेक वेळा लोकल रेल्वेचे प्रवासी आपला संताप मोटरमनवर काढताना दिसतात, मोटरमनला मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत, मात्र मोटरमनवर संताप व्यक्त करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी महत्वाची आहे.
रेल्वे ट्रॅकवरील प्रत्येक हालचालीवर मोटरमनचं लक्ष असतं, प्रत्येकाचा जीव वाचवण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न असतो, हे यावरून लक्षात येतं.
बोरिवलीहून चर्चगेटकडे निघालेली लोकल दादरच्या पुढे आली, रात्रीची वेळ असली, तरी ट्रॅकवर हालचाल दिसत होती, तेव्हा प्रसंगावधान राखून मोटरमनने गाडीचा वेग कमी केला, नंतर गाडी थांबवली, कारण रूळावर एक चिमुरडी आली होती, तिला रेल्वे पोलिसांकडे दिलं आणि उशीर होऊ नये म्हणून लगेच गाडी पुढे नेली.
रोज रेल्वेत मृत्यू पावणाऱ्या प्रवाशांची संख्या काही कमी नाही, मात्र मोटरमन मुनेश कुमार कुरुश्रेष्ठ यांनी त्या बालिकेला वाचवलं, पश्चिम रेल्वेकडून कुरूश्रेष्ठ यांचं कौतुक होत आहे.
कुरुश्रेष्ठ यांची कामावरची निष्ठा आणि वेळीच दाखवलेली प्रसंगावधानता पाहून पश्चिम रेल्वे प्रशासनाने त्यांचे कौतुक केले. कुरुश्रेष्ठ यांनी घडल्या प्रकाराचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला.