www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची उद्या मुंबईत सभा होतेय.२२ डिसेंबरच्या या रॅलीसाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागलेत.
मुंबईत मोदींच्या रविवारी होणाऱ्या महागर्जना रॅलीसाठी भाजप संपूर्ण ताकद पणाला लावतंय. २२ डिसेंबरला दुपारी वांद्र्याच्या एमएमआरडीए मैदानात मोदींची ही रॅली होतेय. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची रात्रंदिवस तयारी सुरू आहे. मोदींच्या या रॅलीसाठी ४००० खासजी बसेसची व्यवस्था करण्यात आलीय.
शेजारील राज्यांमधली जनता मोठ्या प्रमाणावर मोदींच्या सभेला येण्याची शक्यता असल्यानं भाजपनं देशभरातून मुंबईकडे येणाऱ्या तब्बल २२ ट्रेन्स बुक केल्या आहेत. मध्य रेल्वेच्या १२ गाड्या दादर, सीएसी आणि ठाण्यापर्यंत येणार आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या १० गाड्या मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि दादरपर्यंत धावणार आहेत.
एमएमआरडीएच्या ज्या मैदानात रॅली होणार आहे, तिथं वाय-फायची सुविधा देण्यात आलीय. ही रॅली यशस्वी होण्यासाठी ५० पेक्षा जास्त थिएटर्समध्ये अॅड कॅम्पेन सुरू झालंय. त्याशिवाय या रॅलीसाठी १० हजार चहावाल्यांना आमंत्रण देण्यात आलंय.
नरेंद्र मोदींच्या या रॅलीसाठी मुंबई पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीनं पुरेपूर तयारी केलीय. चार राज्यांत मिळालेल्या यशानंतर भाजपमध्ये सेलिब्रेशनचा माहोल आहे. आता मोदींचा हाच करिश्मा महाराष्ट्रातही चालेल अशी भाजपला आशा आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.