www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरणी रात्री उशिरा आणखी एका आरोपीला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत या प्रकणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या दोन झाली आहे. याप्रकरणातील तीन आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
गँगरेप प्रकरणातील दुसऱ्या आरोपीलाही पोलींसानी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या दोन्ही आरोपींना एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही आरोपींना आज भोईवाडा कोर्टात हजर केलं जाणार आहे.
आज पहाटे ३ वाजता गृहमंत्री आर आर पाटील यांनी एन एम जोशी पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. आणि सुत्रांकडून मिळालेल्या माबितीनुसार गृहमंत्र्यांनी दोन्ही आरोपींची चौकशी केली. अजूनही ३ आरोपींचा शोध सुरु आहे मात्र ते देखील लवकरच सापडतील असा विश्वास पोलिसांना आहे. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २० पेक्षा जास्त पथकं तयार करण्यात आली आहेत. ही पथकं मुंबई आणि परिसरात आरोपींचा कसून तपास करत आहेत.
पीडित मुलीवर सर्जरी करण्यात आलीय. तिच्या प्रकृतीचा धोका टळलाय. पण ती अजूनही मानसिक धक्क्यात असल्याची माहिती जसलोक हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ. तरंग यांनी दिलीय. पीडित मुलीवर उपचार सुरु असून याबाबत सर्व मेडिकल प्रोटॉकॉलचं पालन केलं जातंय असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जसलोक हॉस्पिटलमध्ये जाऊन बलात्कार पीडित तरुणीची विचारपूस केली. सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी आशा व्यक्त करतानाच वाढते गुन्हे लक्षात घेता राज्यात पोलिसांची संख्या वाढवण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.