मुंबई गिरगाव चौपाटीवर 'मेक इन इंडिया' कार्यक्रम घेण्यास मनाई

‘मेक इन इंडिया’ महोत्सवाअंतर्गत गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राज्य शासनाला जोरदार झटका बसलाय.

Updated: Jan 28, 2016, 05:07 PM IST
मुंबई गिरगाव चौपाटीवर 'मेक इन इंडिया' कार्यक्रम घेण्यास मनाई title=
संग्रहित छाया

मुंबई : ‘मेक इन इंडिया’ महोत्सवाअंतर्गत गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राज्य शासनाला जोरदार झटका बसलाय.

चौपाटीवर विसर्जन सोहळा वगळता कोणालाही राजकीय कार्यक्रम अथवा सभा घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने चौपाटीवर होणाऱ्या शासनाच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला परवानगी देण्यास नकार दिला. 

येत्या १३ फेब्रुवारीपासून मुंबईत ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम होणार आहे. ‘मेक इन मुंबई’ या संकल्पनेच्या दृष्टीने गिरगाव चौपाटीवर १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे राज्य सरकारने ठरविले होते. राज्य सरकारने चौपाटीवर कार्यक्रमाच्या परवानगीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. गिरगाव चौपाटीवर होणारा कार्यक्रम राजकीय नसून तो जनतेसाठी खुला आहे, असा युक्तीवाद करण्यात आला होता.

तसेच कार्यक्रमला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध देशांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेता न्यायालयाने त्यास परवानगी द्यावी, अशी बाजू सरकारच्यावतीने न्यायालयात मांडण्यात आली होती. मात्र, न्यायालयाहा युक्तीवाद फेटाळून लावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उद्योग प्रोत्साहन संकल्पनेला खऱ्या अर्थाने चालना देण्यासाठी देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत याविषयीचा एक सप्ताहच आयोजित करण्यात आला आहे. ‘मेक इन इंडिया सप्ताहा’चे उद्घाटन नरेंद्र मोदी मुंबईत करणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.