मुंबई : पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने शिवसेनेपुढे तिकिट कोणाला द्यायचा याचा पेच निर्माण झाला. शिवसेना नेतृत्वाने काहींची समजूत काढण्यात यश मिळवले. तर काहींना तिकिट न मिळ्याल्याने अधिकृत उमेवारांविरोधात दंड थोपटत बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी उतरलेल्या सेनेला बंडखोरी थोपविण्याचे मोठे आव्हान आहे.
विद्यामान महापौर स्नेहल आंबेकर यांनी अखेर प्रभाग क्रमांक १९८ येथून उमेदवारी अर्ज भरला. शिवसेनेने त्यांना १९५ मधून उमेदवारी दिली होती. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध केला. या विरोधामुळं पक्षानं त्यांना १९८ मधून उमेदवारी दिलीय. त्यांच्या जुन्या प्रभागाचा बराचसा भाग हा १९८ मध्ये येत असल्यानं त्याही याच प्रभागातून इच्छूक होत्या. कामाच्या जोरावर पुन्हा निवडून येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी प्रभाग क्रमांक १९९ मधून उमेदवारी अर्ज भरला. प्रभाग पुनरर्चनेत त्यांच्या जुन्या प्रभागातचे अस्तित्वच संपुष्टात आल्यानं त्यांना पक्षाने १९९ मधून उमेदवारी दिली. मात्र, यामुळे स्थानिक शाखाप्रमुख राजेश कुसळे नाराज झालेत. त्यांना त्यांच्या पत्नीसाठी हा प्रभाग हवा होता. अखेर उद्धव ठाकरेंनी त्यांची समजूत काढल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा मार्ग मोकळा झाला.
गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 51 मध्ये घराणेशाही असल्याचे दिसून येतंय. शिवसेनेत एकाच कुटुंबातील दोनवेळा आईला तिकीट त्यानंतर सुन आणि आता मुलागा स्वप्निल टेंबकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शिवसनेचे कामगार संघटनेचे संदीप जाधव यांनी बंडखोरी करत संभाजी बिग्रेडमध्ये प्रवेश केला. प्रभाग क्रमांक 51 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. या प्रभागातून संदीप जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला.
माहिमच्या वॉर्ड क्र. 190 मध्येही शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसलाय. शिवसेनेनं तिथून माजी उपविभागप्रमुख राजू पाटणकर यांच्या पत्नी वैशाली पाटणकर यांना उमेदवारी दिलीय. मात्र महिला शाखा शाखासंघटक रोहिता महेंद्र ठाकुर यांनी त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय. वैशाली पाटणकर यांनी कधी शाखेचं तोंडही पाहिलेलं नाही. मात्र तरीही आमदार आणि विभागप्रमुख सदा सरवणकर यांनी पाटणकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानं, नाराज निष्ठावंत शिवसैनिकांनी दंड थोपटले आहेत.