www.24taas.com, मुंबई, निवेदिता मिश्रा, झी २४ तास
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर एकांतात बसणाऱ्या प्रेमी युगुलांवर कारवाईबाबत मुंबई पोलिसांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे. या प्रेमी युगुलांना दंड करण्याऐवजी त्यांना थोडी समज देऊन सोडण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. यापूर्वी प्रेमी युगुलांना दंड करण्याचं, तर अल्पवयीन युगुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावण्याची सूचना जारी करण्यात आली होती.
बँड स्टँड, मरीन ड्राईव्ह, वरळी चौपाटी, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी या ठिकाणी अशी प्रेमी युगुलांची गर्दी नेहमीच पहायला मिळते.. एकांताच्या शोधात आणि प्रेमाच्या गप्पा मारण्यासाठी ही मंडळी या ठिकाणांवर गर्दी करतात. आता या प्रेमी युगुलांवर पोलिसांचीही करडी नजर आहे.. किनाऱ्यांवर मोठ्या दगडांच्या पाठीमागे बसून अश्लील चाळे करणाऱ्या युगुलांवर कठोर कारवाईचे आदेश, यापूर्वी मुंबई पोलिसांना देण्यात आले होते.
मात्र काही तासांतच या फर्मानात दुरुस्ती करत, थोडी नरमाईची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. पूर्वीच्या फर्मानानुसार प्रेमी युगुलांकडून दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर अल्पवयीन युगुलांच्या आई-वडिलांना ठाण्यात बोलावण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. आता मात्र दंडात्मक कारवाई न करता, केवळ पोलिसी भाषेत समज देऊन या प्रेमी युगुलांची सुटका होणार आहे. दिल्ली आणि मुंबईतील महिला बलात्कारांच्या प्रकरणांनंतर पोलिसांनी हे नवं फर्मान जारी केलं होतं, मात्र महिलांकडूनच याला विरोध झाल्यानं अखेर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.