www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फोटो जर्नलिस्ट तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केलीय. गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेल्या आर. आर. पाटलांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरलीय. तर राजीनामा देण्याची गरज नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आबांची पाठराखण केलीय.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्र्यांना बांगड्यांचा आहेर देण्याचं आवाहन काय केलं, मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी बांगड्यांची जमवाजमव सुरू केलीय. फोटो जर्नलिस्टच्या बलात्कारानंतर राज यांनी ठाकरी शैलीत पोस्टमन, पवारांचे कुरिअर अशा शब्दांत गृहमंत्री आबांचे वाभाडे काढले.
शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याही ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यावर मोर्चा घेऊन गेल्या. मुंबईला लाज आणणा-या या प्रकरणातील आरोपींना पकडून त्यांची धिंड काढावी, असा हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चढवलाय. या घटनेनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतेय...
विरोधकांनी सडकून टीका केल्यानंतर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून गृहमंत्री आबांची पाठराखण सुरू झालीय. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय... तर शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आर. आर. यांना पाठीशी घातलंय.
महाराष्ट्रात लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळं बलात्काराच्या या घटनेनंतर आपापल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांची लगबग सुरू झालीय...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.