www.24taas.com, मुंबई
शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असं वक्तव्य भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सामनातून उद्धव राज एकत्र आले तर काहीजणांच्या पोटात का दुखतं असा सवाल केला होता. तर राज यांनीही `झी २४ तास`ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव हा माझा भाऊच आहे. असं वक्तव्य केलंय. त्यापार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे यांच्या वक्तव्याला महत्व आलंय.
उद्धव ठाकरे लीलावतीत दाखल झाल्याचं कळताच राज ठाकरे भावाची भेट घ्यायला गेले. त्यानंतर मातोश्रीपर्यंत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीचं सारथ्यही केलं.... तेव्हापासूनच उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार का, याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले..... एरवी दोघांच्या भाषणांत एकमेकांबद्दल दिसणारी कटुता कमी होऊन थोडासा जिव्हाळा दिसू लागला..... याबद्दल चर्चा सुरू असतानाच राज आणि उद्धव एकत्र आलेत तर इतरांना पोटदुखी का, असं म्हणत बाळासाहेबांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीनं या चर्चेला नवं निमित्त दिलं. बाळासाहेब म्हणतात.
याचसंदर्भात `झी २४ तास`ला दिलेल्या मुलाखतीत राज यांना विचारलं असता, शेवटी उद्धव माझा भाऊ आहे, पण राजकीय गणितं मांडू नका, असं राज ठाकरे म्हणाले. एकत्र येण्याबद्दल दोन्ही ठाकरे मतं मांडत असताना सेना-मनसेची एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालीय, असं गोपीनाथ मुंडेंनी म्हंटलंय. बाळासाहेबांची सामनातली मुलाखत, आणि त्याचवेळी मुंडेंनी सेना-मनसे एकत्र येण्याबद्दल केलेलं वक्तव्य, हा योगायोग असेल कदाचित... पण या निमित्तानं एकत्रीकरणाच्या चर्चेला निमित्तं मात्र मिळालंय.