मुंबई : नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महारष्ट्र केल्यानंतर अनेक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यापैकी अरविंद भोसले हे एक. त्यांनी राणे ज्यावेळी निवडणुकीत पराभूत होतील, तोपर्यंत मी अनवाणी राहीन, अशी प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा त्यांनी राणेंचा पराभव होईपर्यंत पाळली. राणेंचा पराभव २०१४ च्या निवडणुकीत झाल्याने त्यांनी चप्पल वापरण्यास सुरुवात केली.
राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राणे यांचा राजकीयदृष्टय़ा जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत अनवाणी राहण्याची प्रतिज्ञा केलेल्या अरविंद भोसले यांनी केली. भोसले हे सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख आणि वरळीचे विभागप्रमुख म्हणून आहेत.
आरवली येथील वेतोबा मंदिरात २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भोसले यांना सोन्याच्या चपला दिल्या जाणार आहेत. बृहन्मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर, 'बेस्ट' समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर, कुडाळचे आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत, तसेच मुंबई आणि सिंधुदुर्ग येथील शिवसैनिकांकडून या चपला भोसले यांना दिल्या जाणार आहेत.
भोसले यांनी २१ नोव्हेंबर २००५ मध्ये प्रतिज्ञा केली होती. त्यानुसार आत्तापर्यंत पायात चप्पल घातलेली नव्हती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणे पराभूत झाल्यानंतर भोसले यांनी पायात चपला घालायला सुरुवात केली. भोसले यांना शिवसैनिकांकडूनही हजारो चपलांचे जोड देण्यात आले. त्यांची संख्या सुमारे तेराशे इतकी होती. भोसले यांनी हे जोड कसारा, इगतपुरी, वाडा, जव्हार, मोखाडा येथील आदिवासींसाठी पाठवून दिले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.