www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीही अस्वस्थ आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हतबल झालेत आणि आता थेट शरद पवारांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार करा, अशी त्यांची मागणी आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनीही कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिळवलाय.
शरद पवारच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार व्हावेत, ही कार्यकर्त्यांचीच भावना असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर राष्ट्रवादीनं आधीच भ्रष्टाचाराला आळा घालायला हवा, आता शरद पवारांना जरी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार केलं तरी काही फरक पडणार नाही, अशी मत भाजपचे नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केलंय.
शरद पवारांनाच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करा, ही मागणी आताच का पुढं आलीय, त्या कारणांवर नजर टाकूया...
लोकसभेत दारुण पराभव झाल्यानं पक्षात अस्वस्थता
अजित पवारांचं नेतृत्व सर्वमान्य होईल का, याची भीती
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिमा मलीन
पवारांची प्रतिमा जमेची बाजू आणि विकासात महत्त्वाचं योगदान
राज्याची नस न् नस माहीत असणारा नेता
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच यामुळं मुख्यमंत्रीपदासाठी तीन नेत्यांची नावं पुढे आलीय. यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपण विधानसभा निवडणूकीत उभे राहणार आणि सत्ता आल्यास मुख्यमंत्रीही होणार असं जाहीर केलंय. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं... यावरच पुढं आता शरद पवारांचं नाव येतंय. त्यामुळं ही निवडणूकही चांगलीच रंगतदार होईल, असंच दिसतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.