मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव नाराज असल्याची कुणकुण लागल्याने आता राष्ट्रवादीने आता वेगळीच खेळी केली आहे. भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न सुरू केला आहे.
नगरपालिका निवडणुकीतील उमेदवार ठरवताना जाधव यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.
जाधवांनी दिलेल्या नावांचा उमेदवारीसाठी विचार करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक पूर्णपणे भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भात चिपळूण नगरपालिकेचे सर्व एबी फॉ़र्म भास्कर जाधवांकडे सोपवले, असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणावर अजून भास्कर जाधव यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही. भास्कर जाधव हे एबी फॉर्म स्वीकारतील का नवा पर्याय शोधतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी सोपविलेले कोकणातील राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा सुरू होती. माजी आमदार रमेश कदम यांना चिपळूण-संगमेश्वरची जबाबदारी दिल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, जाधव नाराज असले तरी ते पक्ष सोडणार नाहीत, असे खंडन कार्यकर्त्यांनी केले होते.
भास्कर जाधव हे नाराज असल्याने भाजपमध्ये जाणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. रमेश कदम यांच्याकडे नगरपरिषद निवडणुकीची सूत्रे दिलीत. मात्र, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनाही विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे निकमही नाराज आहेत. दरम्यान, भास्कर जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल आहेत.
जाधव प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय. तुम्हाला कोठे जायचे आहे तिकडे जा. मी काहीही सांगणार नाही. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी जाधव यांचा वाद पूर्वीपासून वाद आहे. चिपळूणमध्ये मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्यावेळी स्वागताध्यक्ष पद न मिळाल्याने जाधव यांनी तटकरे यांना टार्गेट केले होते. तेव्हापासून दोघेही एकमेकांना पाण्यात पाहत आहेत.