गडकरींचा प्रस्ताव राज ठाकरेंना अमान्य

भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिलेला प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमान्य केलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळं आता मनसे आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याची शक्यता आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 4, 2014, 08:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिलेला प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमान्य केलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळं आता मनसे आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याची शक्यता आहे.
काँग्रेस विरोधी मतांची विभागणी होऊ नये, यासाठी मनसेने निवडणूक लढवू नये, असा प्रस्ताव नितीन गडकरींनी राज यांच्यापुढं मांडला होता. नितीन गडकरी आणि राज यांच्या भेटीमुळं राजकीय खळबळ उडाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या भेटीवर नाराजीही व्यक्त केली होती.
मात्र गडकरींचा प्रस्ताव राज ठाकरेंनी अमान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... पदाधिका-यांशी होणा-या चर्चेनंतर निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
मराठी माणसाच्या हिताचा निर्णय राज ठाकरे लवकरच घेतली - नांदगावकर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुणालाही भेटायला बोलावलेलं नसल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय... महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचा निर्णय राज ठाकरे लवकरच घेतील असंही त्यांनी सांगितलंय...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज-गडकरी भेटीनंतर व्यक्त केलेल्या आक्रमक नाराजीपेक्षा राज यांची आक्रमकता जास्त असल्याचं सांगत त्यांनी शिवसेनेवर टीका केली...
राज-गडकरी भेट सेनेच्या जिव्हारी लागली
राज-गडकरी भेटीनंतर आता महायुतीत महाभारत सुरू झाले आहे. या भेटीमुळं उद्धव ठाकरे प्रचंड नाराज झाल्यामुळं महायुतीत अस्वस्थता पसरली आहे. ही भेट शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली असून महायुतीला मनसेची गरज नसल्याची तिखट प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
एकटं पडलेल्या मनसेला कुणी महायुतीत आणू पाहत असेल तर ते चूक असल्याची टीकाही त्यांनी केलीय. महाराष्ट्रात महायुतीबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार केवळ उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनाच असून दुस-या कुणालाही नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.
जे मनसेला महायुतीत घुसवू पाहत आहेत त्यांचं राज्यात काय स्थान आहे असा चिमटा राऊत यांनी गडकरींना काढलाय. मात्र यामुळं भाजपमध्ये संभ्रमावस्था पसरलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.