मुंबई : रिझर्व्ह बँकेने खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता बँकेतून २४ हजाराहून जास्त रक्कम काढता येणार आहे. आठवड्याला बँक खात्यातून २४ हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची अट शिथील करण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरपासून हा निर्णय लागू होईल.
मात्र मोठी रक्कम २ हजार आणि ५००च्या नव्या नोटांच्या स्वरुपात मिळणार आहे.
५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा लादण्यात आली होती. मात्र आता आठवड्याला २४ हजारापेक्षा जास्त रोकड विड्रॉ करता येईल. ही मर्यादा किती रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, त्याबाबत अद्याप माहिती नाही.
ज्यांना दैनंदिन व्यवहारात मोठी रोकड हाताळावी लागते, अशा बँक खातेधारकांना मोठी रक्कम काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसंच काही जण मोठी रक्कम बँकेत भरण्यासही काकू करत आहेत. त्यामुळेच आरबीआयने अशा खातेधारांना दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे लग्नसराईचा काळ असल्यामुळे अनेक कुटुंबांनाही या निर्णयामुळे हायसं वाटणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा करुन २० दिवस उलटले आहेत. पैसै काढण्यासाठी आणि बदलण्यासाठी बँका आणि एटीएमबाहेर फारशी गर्दी नसली तरी तुरळक रांगा पाहायला मिळत आहेत.
नोटाबंदीच्या घोषणेनंतर ग्राहकांनी बँकेतून काढलेल्या रकमेचीही माहिती आरबीआयनं दिली आहे. गेल्या २० दिवसांत देशभरातल्या बँकांमधून २ लाख १६ हजार ६१७ कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आली. सध्या ग्राहकांना पाचशेच्या जुन्या नोटा महत्त्वाच्या सेवांसाठी वापरता येणार आहे.
देशभरातल्या बँकांमध्ये २७ नोव्हेंबरपर्यंत ३३ हजार ९४८ कोटी रुपयांच्या जुना नोटा बदलण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. तर ८ लाख ११ हजार ३३ कोटी रुपयांची रक्कम बँकांमध्ये जमा करण्यात आली आहे.