... आणि रेल्वेमुळं तिचं आयुष्य झालं उद्ध्वस्थ

घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात मोनिका मोरे या १६ वर्षीय मुलीनं आपले दोन्ही हात गमावलेत. तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरूयत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 13, 2014, 12:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात मोनिका मोरे या १६ वर्षीय मुलीनं आपले दोन्ही हात गमावलेत. तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरूयत.
कुर्ल्याच्या नेहरुनगर भागात राहणारी मोनिका शनिवारी दुपारी घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल पकडताना हात घसरून खाली पडली होती. तिला सुरुवातीला राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. त्यानंतर तिला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
अवयव तुटलेल्या रुग्णांवर वेळेवर हाडांची जुळवाजुळव करण्यासाठी ठराविक काळात शस्त्रक्रिया करावी लागते. पण मोनिकाला हॉस्पिटलमध्ये आणण्यास उशीर झाला. तिच्या प्रकृतीचा धोका टळला असला तरी तिला तिचे दोन्ही हात गमवावे लागलेत... घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये घडलेला हा प्रसंग दुर्देवी होता.
दरम्यान, आई... हे काय झाले गं?... माझे हात कुठे आहेत?... रेल्वेनं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं... आई-बाबा मला आता जगायचंच नाही.. असा टाहो दुर्दैवी मोनिका मोरे या विद्यार्थिनीनं फोडला तेव्हा रुग्णालयातील सारेच जण हेलावून गेले.
असा झाला अपघात
घाटकोपरच्या फलाट क्रमांक दोनवर प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचं काम सुरू आहे. १५ डब्यांची ट्रेन थांबण्यासाठी ही रुंदी वाढवताना आधीचा प्लॅटफॉर्म आणि नवीन बांधकाम यामध्ये समतोल करण्यात आलेला नाही. प्लॅटफॉर्मचा हा असमतोलपणा आणि रेल्वे फुटबोर्ड आणि प्लॅटफॉर्म यामधील अंतरामुळंच मोनिका रेल्वेखाली खेचली गेली.
प्लॅटफॉर्मची योग्य उंची असती तर ती प्लॅटफॉर्मवरच पडली असती आणि अनर्थ टळला असता. वेळोवेळी कोलमडणारं रेल्वेचं वेळापत्रक, मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि यावर मात करीत रेल्वे पकडणार्यार मुंबईकरांसाठी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची कमी असलेली उंची मृत्यूचा सापळाच ठरत आहे. वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासन आणि सरकारचं याकडं दुर्लक्षच होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ