www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईची लाईफ-लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेमधून दररोज एक व्यक्ती गायब होते... हे धक्कादायक सत्य उघड केलं `जीआरपी`च्या आकड्यांनी...
नुकताच, एक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असलेला तरुण लोकमान्य टिळक रेल्वे स्टेशनमधून गायब झाल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर त्याचा मृतदेह भांडूपमध्ये आढळला. त्याचप्रमाणे इस्टर अनुहया नावाची तरुणी काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवरून बेपत्ता झाली. तिचाही मृतदेह भांडूपच्या झाडाझुडुपांत आढळून आला. या दोघांचा मृत्यूचं कोडं अजूनही पोलिसांना सुटलेलं नाही. त्यातच रेल्वे बातम्यांमधून जाहीर झालेल्या `जीआरपी`च्या आकड्यांमुळे सर्वसामान्यांना धक्काच बसेल असं सत्य समोर आलंय.
वर्ष २०१३ मध्ये मुंबईतील विविध स्टेशनमधून ३६५ लोक गायब झालेत. म्हणजेच, दिवसाला एक व्यक्ती मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरून बेपत्ता होतोय. यामध्ये सर्वांत जास्त संख्या आहे ती लहान मुलांची. गायब झालेल्या व्यक्तींपैकी काही अर्धेअधिक लोक नंतर सापडल्याचेही काही उदाहरणं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन आणि रेल्वे परिसरातून जास्त लोक गायब झाले आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सर्वांत जास्त लोक बेपत्ता झालेत. पोलिसांकडे प्रत्येक दिवशी कुणा ना कुणाची बेपत्ता होण्याच्या तक्रारीची नोंद होते.
त्याशिवाय, प्रत्येक वर्षी हजारो जण रेल्वेखाली येतात. त्यापैंकी अनेकांची साधी ओळखसुद्धा पटत नाही. मुंबईमध्ये देशाच्या काना-कोपऱ्यातून रोजगाराच्या शोधात लोक दाखल होतात. त्यातील अनेक लोक कुठे गडप होतात, हे कुणालाही कळत नाही. याशिवाय मुंबईत लहान मुलं चोरणारी गँगही कार्यरत आहे. या मुलांना चोरून त्यांना जबरदस्तीनं भीक मागायच्या कामाला लावलं जातं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.